अर्जूना नदीतून प्रकटले ‘श्रीगणेश’, उत्खणनात सापडली पूरातन मूर्ती !

सिंधुदुर्ग/राजापूर : पोलीसनामा ऑनलाइन – पुलाच्या बांधकामासाठी नदीत खोदकाम करत असताना गणपतीची प्राचीन मूर्ती सापडली आहे. डावी सोंड असलेली आणि एका हातात परशू असलेली गणपतीची ही मूर्ती शेकडो वर्षे पूरातन असावी, असा अंदाज गावकऱ्यांनी वर्तवला आहे. गणपतीची मूर्ती पाहणासाठी परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी गर्दी केली आहे. मात्र, ही मूर्ती नदीत कशी आणि कुठून आली याबाबत कोणतीही ठोस माहिती मिळाली नसून या मूर्तीबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

या ठिकाणी सापडली मूर्ती
कोकणातील राजापूर जिल्ह्यातील रायपाटण गावातून वाहणाऱ्या अर्जूना नदी पात्रात ही मूर्ती सापडली आहे. याच गावातल्या बागवाडी, कदमवाडी, खाडेवाडी आणि बौद्धवाडी या चार वाड्या नदीपलीकडे आहेत. याच चार वाड्यांना रायपाटणशी जोडणाऱ्या पुलाचे काम सध्या सुरु आहे. पुलाच्या खांबासाठी नदीपात्रात खोदकाम सुरु असताना जेसीबी मशीन ऑप्रेटरला बकेटमध्ये मातीसोबत एक पाषाण वर आलेला दिसला. इतर दगांडांप्रमाणे हा दगड नसून हे काहीतरी वेगळे असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने लगेच उत्खननाचे काम थांबवून हा दगड निरखून पाहिला. त्यावेळी त्यावरील माती दूर केली असता ही गणपतीची मूर्ती असल्याचे लक्षात आले. याची माहिती गावकऱ्यांना मिळताच गावकऱ्यांनी नदीजवळ गर्दी केली. गावकऱ्यांनी ही मूर्ती नदीकिनारी ठेवली आहे.

मूर्तीचे वैशिष्ट्य
डाव्या सोंडेच्या गणपतीच्या मूर्तीची उंची 16 ते 17 इंच आहे. मूर्तीच्या एका हातात परशू आहे. ही मूर्ती प्रत्यक्षात काळ्या दगडाची असावी आणि बरीच वर्षे जमिनीखाली राहिल्याने तिचा रंग बदलला आहे. ही मूर्ती किती पुरातन असावी, याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही. पुरातत्व आणि भूगर्भ अभ्यासकांसाठी आता ही मूर्ती म्हणजे एक संशोधनाचा विषय ठरली आहे.

मूर्तीबाबत चर्चांना उधाण
अर्जूना नदीपात्रात मिळालेल्या गणपतीच्या मूर्तीबाबत परिसरात तर्क वितर्क लढवले जात आहेत. शेकडो वर्षापूर्वी नदीपात्रात एखादे गणपतीचे मंदिर असावे आणि मूर्तीभंजनाच्या काळात आक्रमकांकडून या मूर्तीचं रक्षण करण्यासाठी त्या काळात ती नदीपात्रात लपवून ठेवली असावी. किंवा फार वर्षापूर्वी या भागात मोठा पूर आला असावा, पुराच्या लोंढ्यात ही मूर्ती नदीपात्रात वाहून आली असेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/