‘कोरोना’मुळे ज्येष्ठ कलावंतांना सेटवर परवानगी नाहीच

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता शासनाची ज्येष्ठ कलाकारांना सेटवर येऊ देण्याची तयारी नसल्याचे दिसून आले आहे. निर्मात्यांच्या संस्थेने, चित्रपट महामंडळाने ज्येष्ठ कलाकारांना सेटवर येऊ देण्याची परवानगी मागितली होती. पण नव्या अध्यादेशातही या कलाकारांना घरीच थांबण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

मनोरंजनसृष्टीत आता चित्रीकरण व्हायला सुरुवात झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर शासनाने नवा अध्यादेश काढला आहे. त्यात काही नव्या सुधारित अटी-शर्तींचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार चित्रीकरणाच्या सेटवर रुग्णवाहिका, डॉक्टर, नर्स नसले तरी चालणार आहे. पण त्याचवेळी सेटवर रुग्णाला नजीकच्या रुग्णालयात घेऊन जाणारी एक गाडी तयार असणे अत्यावश्यक आहे. शिवाय त्या गाडीत प्रथमोपचार करण्याच्या सुविधा असणे बंधनकारक असणार आहे.

तर 65 वर्षावरच्या कलाकारांना मात्र सेटवर येण्यास मज्जाव असणार आहे. लॉकडाऊन लागण्याला सुरुवात झाली ती मनोरंजनसृष्टीपासून. आधी थिएटर बंद झाली. त्यानंतर चित्रीकरणे बंद झाली. त्यालाही आता तीन महिने उलटले. लॉकडाऊन उठू लागले तेव्हा सगळ्यात शेवटी मनोरंजनसृष्टी असेल असा कयास वर्तवला जात होता. पण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तो खोटा ठरवत, मनोरंजनसृष्टीतल्या विविध मान्यवरांशी चर्चा करुन चित्रीकरणाला सशर्त परवानगी दिली.

त्यात काही अटींवर निर्मात्यांच्या संघटनेने अडचणी असल्याचं सांगत त्या बदलण्याची विनंती शासनाला केली होती. त्यात प्रत्येक सेटवर डॉक्टर, नर्स आणि रुग्णवाहिका ठेवणे अशक्य असल्याचे मत नोंदवण्यात आले होते.