मोदींच्या ‘त्या’ वक्तव्यावर उमर अब्दुल्ला म्हणतात..

श्रीनगर : वृत्तसंस्था – पुलवामा हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. याच पार्श्वभूमीवर काही ठिकाणी काश्मीरी तरुणांना, विद्यार्थ्यांना मारहाणीच्या घटना समोर आल्या. या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र माेदींनी भाष्य केलं. शिवाय काश्मीरी विद्यार्थ्यांना सुरक्षेची हमी दिली. ‘देशात असं व्हायला नको,’ असंही ते म्हणाले होते. यानंतर आता जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. तसेच अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये असे म्हणाले.

अब्दुल्ला यांनी याबाबत ट्विट केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, ” धन्यवाद, नरेंद्र मोदी साहेब, आज आपण आमच्या मनातलं बोललात.लवामा हल्ला होऊन आठवडाभराचा कालखंड झाला. तेव्हापासून काश्मिरी लोक जनाक्रोशाचा सामना करत आहेत. आता पंतप्रधान मोदी याबद्दल बोलले आहेत. त्यामुळे आता तरी काश्मिरी लोकांना लक्ष्य करणाऱ्या शक्ती आपले हल्ले थांबवतील.” अशी आशाही अब्दुल्ला यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केली आहे.

राजस्थानमधील टोंक येथे जाहीर सभेत मोदी बोलत होते यावेळी त्यांनी काश्मीरी विद्यर्थ्यांवर होणाऱ्या हल्ल्यावर भाष्य केलं. यावेळी बोलताना त्यांनी ‘देशात असं व्हायला नको’ असं म्हणत नाराजी व्यक्त केली. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “आमची लढाई दहशतवादाविरोधात आहे. आमची लढाई काश्मीरसाठी आहे. काश्मिरींच्या विरोधात नाही. काश्मिरी मुलांच्या सुरक्षेची जबाबदारी आमची आहे. काश्मीरचे तरुण दहशतवादाच्या विरोधात आहेत. त्यांना आपल्याला बरोबर घेऊन पुढे जायचे आहे.” त्यांच्या या वक्तव्याबद्दल उमर अब्दुल्ला यांनी मोदींना धन्यवाद म्हटलं आहे.

दरम्यान, पुलवामा हल्ल्यानंतर देशभरात काही ठिकाणी काश्मिरी विद्यार्थी आणि उद्योजकांना लक्ष्य केले जात आहे. याविरोधात नॅशनल काँन्फरन्सने श्रीनगरमध्ये निदर्शने केली आहेत. यानंतर आता मोदींनी त्यावर भाष्य करत काश्मीरी विद्यार्थ्यांना सुरक्षेची हमी दिली आहे.