उमर आणि फारूक अब्दुल्ला नजरबंद, महबूबा मुफ्ती यांना पुलवामा येथे जाण्याची परवानगी नाही

श्रीनगर : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूक अब्दुल्ला आणि त्यांचे पुत्र उमर अब्दुल्ला यांना श्रीनगरमध्ये त्यांच्या घरात नजरबंद केले आहे. उमर अब्दुल्ला यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. तर माजी सीएम आणि पीडीपीच्या प्रमुख महबूबा मुफ्ती यांना काल पुलवामा येथे जाण्याची परवानगी नाकारण्यात आली.

उमर अब्दुल्ला यांच्या घरासमोर एक मोबाइल सिक्युरिटी वाहन उभे करण्यात आले आहे. उमर आज गुलमर्ग येथे जाणार होते, तर त्यांचे वडील फारूक अब्दुल्ला यांना काश्मीर खोर्‍यातील गांदरबल क्षेत्राचा दौरा करायचा होता. पोलिसांनी एका वक्तव्यात म्हटले की, पुलवामा हल्ल्याची वर्षपूर्ती असल्याने हे पाऊल उचलण्यात आले आहे.

नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष उमर अब्दुल्ला यांनी ट्विट केले की, हा ऑगस्ट 2019 च्या नंतरचा नवा जम्मू काश्मीर आहे. काहीही न सांगता घरांमध्ये बंद केले आहे. हे खुप वाईट आहे की त्यांनी माझे खासदार असलेले वडील आणि मला आमच्या घरात कैद केले आहे. अशा प्रकारे माझी बहिण आणि तिच्या मुलांना त्यांच्याच घरात बंद केले आहे.

उमर अब्दुल्ला यांनी म्हटले, म्हणजे तुमच्या लोकशाहीच्या नवीन मॉडलचा अर्थ आहे की, कोणत्याही स्पष्टीकरणाशिवाय आम्हाला आमच्या घरात बंद ठेवले जाणार आहे. घरात काम करणार्‍या स्टाफला सुद्धा कामावर येण्यासाठी सोडले जात नाही आणि तुम्ही म्हणता मी अजूनही नाराज आहे.

तर महबूबा मुफ्ती यांनी सुद्धा या प्रकारावरून तक्रार केली होती. त्यांनी एक व्हिडिओ सुद्धा पोस्ट केला होता, ज्यामध्ये त्यांना घरातून बाहेर पडण्यास प्रतिबंध लावल्याचे म्हटले आहे. महबूबा मुफ्ती यांचे म्हणणे होते की, बनावट चकमकीत कथित प्रकारे मारण्यात आलेल्या अतहर मुश्ताकच्या कुटुंबियांना त्यांना भेटायचे होते. परंतु नेहमीप्रमाणे घरात त्यांना नजरबंद ठेवण्यात आले.