Coronavirus : ‘कोरोना’चा अमेरिकेत हाहाकार ! दिवसात 10000 नवीन रूग्ण अन् 150 जणांचा मृत्यू

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेतही कोरोना व्हायरसचा प्रकोप चालूच आहे. अमेरिकेत ट्रम्प सरकराने देखील लॉकडाऊन जाहीर केले आहे. मात्र येत्या १२ एप्रिलला पुन्हा जोमाने सर्व सुरू होईल असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे. पण सध्याची अमेरिकेतली स्थिती पाहता हे कसे शक्य होणार हा मोठा प्रश्न आहे कारण अमेरिकेत कोरोनाने रौद्ररूप घेतले असून एका दिवसात तब्बल १०००० नवे रुग्ण सापडले आहेत.

वर्ल्डोमीटरनुसार मंगळवारची आकडेवारी

Covid-19 वर लक्ष ठेवणाऱ्या वेबसाईट वर्ल्डोमीटरनुसार मंगळवारी दिवसभरात अमेरिकेमध्ये १०००० रुग्ण सापडले आहेत. यामध्ये संक्रमितांची संख्या ५४००० वर जाऊन पोहोचली आहे. तर एकाच दिवशी १५० जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृत्यूंची संख्या ७०० वर पोहोचली आहे.

ईस्टर कोरोनासाठी डेडलाईन

कोरोनाबाबत बोलताना ट्रम्प यांनी सांगितले की, प्रत्येकाने सोशल डिस्टंस ठेवावा. मोठ्या सभा घेऊ नयेत, हात धुवा आणि अन्य बाबींपासून वाचवा. आपण अदृष्य शत्रूसोबत लढत आहेत. ही ऐतिहासिक लढाई आहे. तिच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचलो आहोत. येत्या ईस्टरपर्यंत सर्वकाही ठीक होईल. हे देशासाठी चांगलेच असले, सर्वजण चांगले काम करत आहेत. ईस्टर कोरोनासाठी डेडलाईन आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

अमेरिका तिसऱ्या क्रमांकावर

अमेरिकेमध्ये लॉकडाऊन केल्याने लाखो लोक घरातच बंद झाले आहेत. एका दिवसात अमेरिकेमध्ये १५० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रुग्ण पॉझिटिव्ह सापडण्याच्या या वाढत्या आकड्यामुळे अमेरिका तिसऱ्या क्रमांकावर असून चीनविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. अमेरिकेने राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करत कोट्यवधी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. कोरोनाला थोपविण्यासाठी अमेरिकेने अनेक राज्यांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेसह सशस्त्र सैनिकांनाही रस्त्यावर उतरविले आहे. एकट्या न्यूयॉर्कमध्ये मंगळवारी ५३ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ५००० नवीन रुग्ण सापडले आहेत. न्यूयॉर्कमध्ये आतापर्यंत कोरोनाचे २५००० हून अधिक रुग्ण समोर आले आहेत. तर २१० जणांचा मृत्यू झाला आहे.