देशातील पहिलीच घटना ! गुराखी निघाला ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, 47 बकऱ्यांना केले क्वारंटाईन

बंगळुरू : वृत्तसंस्था –   देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना क्वारंटाइन करण्यात येत आहे. मात्र, कर्नाटकमध्ये एक गुराखी कोरोना पॉझिटिव्ह निघाला असून त्याच्याकडील 47 बकऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. बकऱ्या चरणारा गुराखी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

देशात कोरोनाचा कहर वाढत असताना कोरोना रुग्णांची संख्या इतरांच्या तुनलेत कमी असलेल्या कर्नाटक राज्य तसे अलिप्त राहिले होते. मात्र, कर्नाटकची राजधानी बेंगळुरूपासून 127 किमी लांब असलेल्या तुमकुर जिल्ह्यातील गोडकेरे गावात राहणारा गुराखी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले. त्यामुळे तो राखत असलेल्या 47 बकऱ्यांना क्वारंटाइन केले असून भारतातील अशाप्रकारची ही पहिलीच घटना आहे.

जिल्हा पशुपालन अधिकारी यांनी सांगितले की गौरलहट्टी तालुक्यामध्ये जवळपास 300 घरे आहेत. येथील लोकसंख्या खूप कमी म्हणजे एक हजार एवढी आहे. या ठिकाणी गुराख्यासह दोघे गावकरी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. याशिवाय चार बकऱ्यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. यामुळे गावकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण आहे. गावकऱ्यांनी सांगितले की, काही बकऱ्यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे.

या प्रकारानंतर खडबडून जागे झालेल्या जिल्हा प्रशासनाने पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तातडीने गावामध्ये रवाना केले. पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बकऱ्यांना गावाबाहेर क्वारंटाइन केले. या बकऱ्यांचे स्वॅब नमुने घेण्यात आले असून ते नमुने भोपाळच्या पशु स्वास्थ्य आणि पशु उपचार संस्थेला पाठविण्यात आले आहेत.

मृत बकऱ्याचे शवविच्छेदन

पशुपालन विभागाने सांगितले की, या घटनेची माहिती मिळाली आहे. मृत बकऱ्यांचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. या बकऱ्यांचे नमुने बंगळुरूच्या इंस्टिट्यूट ऑप अॅनिमल हेल्थ अँड वेटेनरी बायलॉजिकल्सला पाठवण्यात आले आहेत.

..तर हे पहिलेच प्रकरण असेल

इंस्टिट्यूट ऑप अॅनिमल हेल्थ अँड वेटेनरी बायलॉजिकल्सचे संचालक डॉ.एसएम बायरेगौडा यांनी सांगितले की, माणसाकडून जनावरांना कोरोना झाल्याचे आतापर्यंत कुठेही आढळलेले नाही. आमच्याकडे तपासणी किट नसल्याने हे नमुने भोपाळला पाठवण्यात आले आहेत. तर UAS च्या GKVK चे प्राध्यापक डॉ. बीएल चिदानंद यांनी सांगितले की, कोरोना व्हायरससारखे जूनोटिक व्हायरस हे सामान्यपणे जनावरांतून माणसामध्ये पसरतात. माणसांपासून जनावरांना त्यांची लागण होत नाही.