काय सांगता ! होय, अनुकंपाखाली नोकरी नाही दिली, पठ्ठयानं लॉकडाऊनमध्ये SBI ची हुबेहुब शाखाच उघडली

चेन्नई : पोलीसनामा ऑनलाइन –  तामिळनाडू राज्यामध्ये स्टेट बँकेची बनावट शाखा उघडल्याचा धक्कादायाक प्रकार समोर आला आहे. महत्वाचे बाब म्हणजे, लॉकडाऊनमध्ये ही बँक उघली होती. स्टेट बँकेच्या माजी कर्मचाऱ्याच्या मुलानेच हा प्रताप केला असून या प्रकरणी तिघांना अटक केली आहे. अनुकंपाखाली मिळेना नोकरी म्हणून उघडली SBI ची बनावट शाखा उघडल्याचे समोर आले आहे.

स्टेट बँकेचे खरे अधिकारी ही शाखा पाहून चकित झाले. कारण, खऱ्या शाखेसारखी अगदी हुबेहूब बँकेची शाखा बनविली होती. एसबीआयच्या माजी कर्मचाऱ्याचा मुलगा कमल बाबू याने हा प्रताप केलाचे समोर आले आहे. त्याने पनरुत्ती बाजार शाखेच्या नावे एक बनावट वेबसाईटही बनविली होती. पोलिसांनी कमलसोबत ए कुमार (42) व एम मणिकम यांनाही अटक केली आहे.

या बोगस शाखेची पोलखोल तेव्हा झाली जेव्हा एसबीआयच्या एका ग्राहकाने या शाखेत त्या शहरातील दुसऱ्या एका शाखेमध्ये चौकशी केली. या ग्राहकाने या बनावट शाखेमध्ये मिळालेली पावती त्या बँकेत दाखविली. ही पावती पाहून मॅनेजरला धक्काच बसला. म्हणून त्यांनीच या बनावट शाखेला भेट दिली. आतमध्ये पाहताच त्यांनाही आणखी धक्का बसला. कारण, तेथील सेटअप देखील एसबीआयसारखाच होता. आता पोलिसांनी या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

कमलचे वडील हे बँकेत कर्मचारी होते. त्यामुळे कलमचे बँकेत नेहमी ये-जा असायचे. यामुळे त्याला बँकेच्या कामकाजाची पुरेपूर माहिती झाली होती. काही वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला अन आई देखील निवृत्त झाली. वडिलांच्या निधनानंतर त्याने स्टेट बँकेत अनुकंपाखाली नोकरी मिळण्यासाठी अर्ज केला होता. मात्र, त्याला नोकरी मिळण्यास खूप उशिर झाल्यामुळे त्याने आपलीच एक शाखा उघडली. कमलवर अद्याप फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेला नाही. त्याने त्याची आई आणि काकीच्या खात्यांवरून स्टेट बँकेचा खऱ्या खातेदारांना पैसे पाठविले आहेत. याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.