पोस्टमार्टमसाठी पाठवलेला व्यक्ती चौकात चहा पिताना सापडला, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

देवरिया : उत्तर प्रदेश देवरियामध्ये एक हैराण करणारा प्रकार समोर आला आहे. येथे एका व्यक्तीचा रस्त्यावरील अपघातात मृत्यू झाला. हॉस्पीटलमध्ये पाठवलेल्या मृतदेहाची ओळख पटल्यानंतर सलेमपुर पोलिसांनी पंचनामा तयार करून मृतदेह पीएमसाठी मर्चरीमध्ये पाठवला. परंतु काही वेळातच समजले की, मृत व्यक्ती तर जिवंत आहे आणि आपल्या गावातील चौकात चहा पित आहे, तेव्हा घाईघाईत पोस्टमार्टम थांबवण्यात आले.

हे प्रकरण सलेमपुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धनौती रेल्वे क्रॉसिंगजवळचे आहे. येथे रस्त्याच्या कडेला एक व्यक्ती जखमी अवस्थेत मिळून आला. त्यास काही लोकांनी अ‍ॅम्ब्युलन्सने सीएचसी सलेमपुर येथे पाठवले जिथे डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. याची माहिती कुणीतरी मईल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्री नगर गावात दिली, की या गावातील फुलेश्वर वय 55 यांचा मृत्यू झाला आहे. जबरदस्त धक्का बसलेला त्यांचा मुलगा रविंद्र काही लोकांसोबत घाईगडबडीत हॉस्पीटलमध्ये पोहचला तेव्हा मृतदेह पाहून रडू लागला, त्याने मृतदेह ओळखल्यानंतर सलेमपुर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टसाठी पाठवला. मुलगा सुद्धा मर्चरीमध्ये गेला.

दुसरीकडे गावात फुलेश्वर यांच्या मृत्यूने शोककळा पसरली होती. अंत्यसंस्कारासाठी बांबूसुद्धा कापून आणले गेले होते. याच दरम्यान गावातील एका चौकात फुलेश्वर हे काही लोकांना चहाच्या दुकानात चहा पिताना दिसले. एकाने त्यांना सांगितले की, तुमचा मृत्यू झाला म्हणून संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे आणि तुमचा मुलगा शवविच्छेदन गृहात गेला आहे, ज्यानंतर तिथूनच त्यांच्या मुलाशी व्हिडिओ कॉलद्वारे बातचित करून देण्यात आली. वडीलांना जिवंत पाहून मुलगा आनंदित झाला आणि घरी परतला. गावात सुद्धा ही बातमी समजताच सर्वजण आनंदी झाले. याची माहिती सलेमपुर पोलिसांना मिळताच त्यांनी बेवारस मृतदेहाचे पीएम तातडीने थांबवले.