ओमराजे निंबाळकरांचे शक्तीप्रदर्शन तर रवींद्र गायकवाड मातोश्रीवर

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – उस्मानाबाद लोकसभा मतदार संघात आज भगवे वादळ आले होते. शिवसेना – भाजपचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी प्रचंड शक्तीप्रदर्शन करून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.  यावेळी पालकमंत्री अर्जुन खोतकर, संपर्कप्रमुख तानाजी सावंत, सह संपर्कप्रमुख शंकरराव बोरकर, भाजपचे आमदार सुजितसिंह ठाकूर आदी उपस्थित होते.

एकीकडे विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड मुंबईत मातोश्रीवर ठाण मांडून बसले असताना, दुसरीकडे उस्मानाबादेत शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांची भव्य रॅली काढून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

मतदारांचे आईवडिलांसारखे प्रेम – ओमराजे निंबाळकर

उस्मानाबाद जिल्ह्यातील मतदारांनी आपल्यावर आईवडिलांसारखे प्रेम केले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी मतदार आपणास प्रचंड मतांनी निवडून देतील असा विश्वास ओमराजे निंबाळकर यांनी व्यक्त केला.

गायकवाड यांची नाराजी दूर होईल – पालकमंत्री

रवींद्र गायकवाड हे सध्या मातोश्रीवर आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बरोबर बोलणी झाल्यानंतर त्यांची नाराजी दूर होईल आणि ते प्रचारात सक्रिय होतील, असे पालकमंत्री अर्जुन खोतकर म्हणाले. संपर्कप्रमुख तानाजी सावंत यांनी देखील हाच विश्वास व्यक्त केला.