नागपुरातील संविधान जागर सभेत घुमणार बहुजनांचा आवाज

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – बहुजन विचार मंचाने संविधान जागरचा घोष सुरू केला असून विविध घटकांना एकत्र करण्याच्या प्रयत्नांतर्गत रविवार, २३ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता मानकापूर स्टेडियमवर सभा आयोजित करण्यात आली आहे. मोदी सरकारवर शरसंधान करणारे अभिनेते प्रकाश राज आणि जेएनयूचे विद्यार्थी नेते व एआयएसएफचे उपाध्यक्ष कन्हैयाकुमार सभेत मार्गदर्शन करणार आहे. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना आमंत्रित करण्यात आल्याची माहिती प्रफुल्ल गुडधे यांनी दिली.

या संविधान जागर सभेची माहिती देण्यासाठी प्रेस क्लब येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी गुडधे बोलत होते. गुडधे म्हणाले, संविधान दिवस साजरा करण्यात आल्यानंतर बहुजन विचार मंचाने संविधान जागर सभा आयोजित केली आहे. मेरी शक्ती-मेरा संविधान अशी घोषणा मंचाने दिली आहे. प्रकाश राज व कन्हैयाकुमार यांच्यासह ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर, काँग्रेसच्या अनुसूचित जाती सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन राऊत, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, अल्पसंख्याक सेलचे नदिम जावेद प्रमुख पाहुणे राहतील.

राज्यघटनेला कुणीही हात लावू शकत नाही. असे असतानाही राज्यघटना बदलण्याची भाषा राज्यकत्र्यांकडून सुरू आहे. जातिधर्माचे राजकारण करणाऱ्या वाईट प्रवृत्ती फोफावल्या आहेत. बहुजनांचे भवितव्य सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वसामान्यांनीदेखील राज्यघटनेची शक्ती जाणून घेणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी जागर करण्यात येत असल्याचे गुडधे यांनी सांगितले.

ही काँग्रेस पक्षाची सभा नसून बहुजन समाजाचा आवाज राहणार आहे, असेही गुडधे म्हणाले. संयोजन समितीत महापालिकेतील विरोधी पक्षनेते तानाजी वनवे हे विविध भागांत बैठका घेऊन सभेची तयारी करीत आहेत. यासह या कार्यक्रमासाठी दोन महिन्यांपासून तयारी सुरू असून कार्यक्रम यशस्वी होणार असल्याचा विश्वास गुडधे पाटील यांनी व्यक्त केला.