पुण्यात ‘हेल्मेट’सक्ती विरोधात ‘सविनय कायदेभंग’ आंदोलन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे पोलिसांनी सुरू केलेल्या हेल्मेट सक्ती विरोधात हेल्मेट सक्ती विरोधी कृती समितीने महात्मा गांधींच्या आंदोलनाची वाट धरली आहे. येत्या 3 जानेवारीला कृती समितीच्या वतीने हेल्मेट शिवाय दुचाकीवर जाऊन पोलीस आयुक्तांना निवेदन देऊन ‘सविनय’ कायदेभंग आंदोलन सुरू करणार आहेत.

पुणे पोलिसांनी मागील काही दिवसांपासून हेल्मेट न घालता दुचाकी चालविणाऱ्या दुचाकीस्वारा विरोधात दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. 31 डिसेंबरला एकाच दिवसात पाच हजार दुचाकीस्वारांवर कारवाई करून नवीन वर्षात हेल्मेट शिवाय दुचाकी चालविणाऱ्या विरोधात कडक कारवाई चे धोरण आखले आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे पुणेकरांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. या पार्श्वभूमीवर सर्व पक्षीय कार्यकर्ते आणि सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या हेल्मेट विरोधी कृती समितीने हेल्मेट सक्ती विरोधात येत्या तीन तारखेपासून सविनय कायदेभंग आंदोलन सुरू करण्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीत घेतला आहे. तीन तारखेला सकाळी साडेनऊ वाजता पत्रकार भवन येथून हेल्मेट न घालता दुचाकी रॅली काढून पोलीस आयुक्त के. वेंकटेशम यांना हेल्मेट सक्ती करू नये यासाठीचे निवेदन दिले जाणार आहे.

या बैठकीला माजी महापौर अंकुश काकडे, शांतीलाल सुरतवाला, मोहनसिंग राजपाल, विवेक वेलणकर, श्याम देशपांडे, संदीप खर्डेकर, धनंजय जाधव, सुर्यकांत पाठक,  डॉ. शैलेश गुजर, बाळासाहेब रूनवाल, मंदार जोशी आदी उपस्थित होते.

हेल्मेटचा ऐच्छिक वापर असावा परंतु सक्ती नसावी ही भुमिका मंडतानाच पोलीस कुठलाही अभ्यास न करता हेल्मेट सक्ती राबवत आहेत. वाहतूक पोलीस वाहतूक नियंत्रण करण्याऐवजी रस्त्याच्या कडेला थांबून दुचाकी चालकांवर दरोडा घालतात. अपघात झाल्यानंतर हेल्मेट कापून काढायचे कटर रुग्णालयात नसते. त्यामुळे हेल्मेट कापून काढताना मेंदूला इजा पोचते. शहरात हेल्मेट नसल्याने किती दुचाकी स्वरांना प्राण गमवावे लागले याची आकडेवारी पोलिसांनी जाहीर करावी. वाहतुकीला शिस्त लावताना अशास्त्रीय गतिरोधक, तुटलेले कठडे, रस्त्यांवरील खड्डे याचा विचार केला जात नाही असे आरोपही यावेळी करण्यात आले.

१ कोटी ७० लाखांच्या लाचेचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत ?