कोथरूड-बावधन क्षेत्रिय कार्यालयाच्या वतीने “कोरोना योध्दयांचा यथोचित सन्मान !

पुणे : शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण ३ मार्च रोजी धायरीच्या सिंहगड रोड परिसरात आढळून आला. पण कोथरूड उपनगरात दोन ते अडीच महिने एकही कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आला नाही. तद्नंतर मात्र कोथरूड उपनगरला देखील कोविड १९ ने सोडले नाही. तेव्हापासून पुणे शहर हे कोरोनाच्या विळख्यातून सुटू शकले नाही. दिवसेंदिवस कोविड रुग्णाची संख्या झपाटय़ाने वाढत होती, यामुळे जनतेच्या मनात भीतीचे वातावरण पसरले होते. जनता हवालदिल झाली होती. माणुसकीचा झरा आटत चालला आहे की काय ? असे वाटत होते.

संपूर्ण देश लाॅकडाउनमुळे जनजीवन ठप्प झाले होते यामुळे संपूर्ण सरकारी यंत्रणा कोविड आटोक्यात आणण्यासाठी सज्ज झाली. कोविडच्या संकटकालीन परिस्थितीत जनता घरात सुरक्षित होती. कोविड रुग्णांना वाचवण्यासाठी जीवाची परवा न करता सफाई कामगार, पोलीस शिपाई दवाखान्यात कोविड रुग्णांना वाचवण्यासाठी डाॅक्टर, आया, नर्स, प्राणपणाने लढत होते. या कोविड योध्दयांना कर्तव्य बजावत असताना काही हल्लेदेखील झाले. या सर्व परिस्थितीला न जुमानता कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालयाचे तरुण तडफदार महापालिका सहाय्यक आयुक्त मा. संदीप कदम यांनी कोविड १९ ला हद्दपार करण्यासाठी व्यूहरचना आखून प्रत्येक खात्याला कोविड सेंटर व स्वॅब सेंटरची उभारणी करून कामाला सुरुवात केली. कोविड १९ ला नियंत्रणात आणण्यासाठी यंत्रणा कमी पडत होती म्हणून महापालिका सहाय्यक आयुक्त यांनी पीएमपीएमएलचे २५० कोरोना योध्दये म्हणून वाहक, फिटर, मेकॅनिक, मदतनीस व कार्यालयीन कामकाज करणारे कर्मचारी तसेच शिक्षण विभागातील कर्मचारी महानगरपालिकेच्या दिमतीला घेतले व कामकाजाचे नियोजन करून वाहक म्हणून काम पहाणारे नागेश गायकवाड व मिलींद आलाटे यांच्यावर संपूर्ण कोविड स्वॅब सेंटर व अ‍ॅन्टीजेन केंद्रावर रुग्णांची तपासणी करून घेण्याची जबाबदारी देण्यात आली आणि ती जबाबदारी त्यांनी स्वतःच्या कुटुंबाला वेळ न देता त्यांच्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन १६ ते १८ तास राबून जबाबदारी त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे पार पाडली.

तसेच आरोग्य खात्यातील वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राम सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली कोथरूड उपनगरातील झोपडपट्टीतील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य निरीक्षक, मोकादम व काही सेवक यांचे पथक तयार करून आहोरात्र झटून कोरोनाग्रस्तांना व त्यांच्या सानिध्यात असणाऱ्या नागरिकांना शोधून तपासण्या करून घेण्यात आल्या व त्वरित विलगीकरण कक्षात दाखल केले शिवाय अति त्रास होणाऱ्या कोरोनाग्रस्तांना तातडीने उपचार करण्यात आले. त्यामुळे कोथरूड भागात कोविड १९ वर नियंत्रण मिळवण्यासाठी यशस्वी व अथक परिश्रम घेणाऱ्या कोविड योध्दयांचा यथोचित सन्मान व्हावा तसेच त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव व्हायला हवा म्हणून कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालयाच्या वतीने महापालिका सहाय्यक आयुक्त मा. संदीप कदम व वरिष्ठ आरोग्य निरीक्षक मा. राम सोनवणे यांच्या हस्ते एकूण २३५ कोविड योध्दयांना “कोविड योध्दा सन्मानपत्र” देऊन सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रम क्षेत्रिय कार्यालयात प्रभाग समिती हाॅलमध्ये घेण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैजीनाथ गायकवाड यांनी केले व सूत्रसंचलन नागेश गायकवाड यांनी केले. या कार्यक्रमास सर्व, डाॅक्टर साबळे, आरोग्य निरीक्षक मोकादम व पीएमपीएमएलचे कैलास डोंगरे,आत्माराम वाल्हेकर, सुभाष पवार, मनोज आयनोर, गणेश कदम, मारोती रावडे, काकासाहेब घुले उपस्थित होते.