जया प्रदा यांच्या मदतीला धावल्या स्वराज सुषमा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जयाप्रदांबद्दल अश्लिल टिप्पणी करणाऱ्या आझम खान यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रीय महिला आयोगानंही त्यांना नोटीस बजावली आहे. त्यानंतर आता परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनीही आझम खान यांना फटकारले आहे. तसेच सुषमा स्वराज यांनी या घटनेची तुलना द्रौपदीच्या वस्त्रहरणाशी केली आहे. मुलायम सिंह यादव यांनी याप्रकरणी भीष्म पितामहांप्रमाणे शांत राहण्याची चूक करू नये, असे ट्विट करून सांगितले आहे.

सुषमा स्वराज यांनी आपल्या टि्वटमध्ये समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव, त्यांच्या पत्नी डिंपल यादव आणि जया बच्चन या महिला नेत्यांनाही टॅग केले आहे. ट्विटमध्ये सुषमा स्वराज म्हणाल्या आहेत की , मुलायम भाई तुम्ही समाजवादी पार्टीचे पितामह आहात. तुमच्यासमोर रामपूरमध्ये द्रौपदीचे वस्त्रहरण होत आहे. तुम्ही भीष्माप्रमाणे शांत राहाण्याची चूक करु नका.

काय आहे प्रकरण –

जया प्रदा रामपूरमधून आझम खान यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. रामपूरमधील प्रचार सभेत भाजप उमेदवार जयाप्रदांबद्दल अश्लिल शेरेबाजी केल्यानं वाद उफाळून आला आहे. जया प्रदा यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याबद्दल आझम खान यांच्याविरोधात एफआयआर दाखल झाला आहे.

आझम खान यांचा इन्कार –

मी रामपूरमधून नऊ वेळा आमदार म्हणून निवडून आलो. मी मंत्री होतो. त्यामुळे काय बोलायचे हे मला समजते. मी कोणाचे नाव घेतले, कोणाचा अपमान केला? हे सिद्ध केले तर निवडणुकीतून माघार घेईन असे आझम खान म्हणाले. प्रसारमाध्यमांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला असे आझम म्हणाले.