इमारतीच्या टेरेसवर देखील ‘नो पार्टी’, पोलिसांचा ‘वॉच’ असणार !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी अद्याप धोका टळलेला नाही. त्यातच ब्रिटनमध्ये सापडलेल्या नव्या स्ट्रेनमुळे धोका वाढला आहे. मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला असला तरी आता रुग्ण संख्या कमी होत असल्याने परिस्थिती आता बऱ्यापैकी नियंत्रणात आहे. कोरोना नियंत्रणात असला तरी त्याचे समूळ उच्चाटन झालेले नाही. त्या पार्श्वभूमीवर नववर्षाचे उत्साहात स्वागत करण्याचे बेत आखणाऱ्या मुंबई करांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.

35 हजार पोलिसांची मुंबईकरांवर नजर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मुंबईत 5 जानेवारी पर्यंत नाइट कर्फ्यू लागू केला आहे. कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेले मुंबई पोलिस देखील अधिक सतर्क असणार आहेत. नव वर्षाच्या पूर्वसंध्ये मुंबईमध्ये 35 हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच अप्रिय घटना टाळण्यासाठी आणि कोरोनाच्या नियमांचे पालन काटेकोरपणे होत आहे की नाही यावर मुंबई पोलिसांची बारीक नजर असणार असल्याचे पोलीस सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nagre Patil) यांनी सांगितले.

तर परिणाम भोगावे लागतील
राज्य सरकारने रात्री 11 ते पहाटे 6 पर्यंत नाइट कर्फ्यू लागू केला आहे. यामुळे हॉटेल पब रात्री 11 वाजता बंद करावे लागतील. जर असे केले नाही तर परिणाम भोगावे लागतील. नियमांचे पालन न करणाऱ्या मालकांवर तसेच कोणीही आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे.

या ठिकाणी जाण्यास मुभा
विश्वास नांगरे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सांगितले की, नाइट कर्फ्यूच्या आदेशानुसार, पाच पेक्षा जास्त लोकांच्या एकत्र येण्यावर बंदी आहे. लोक त्यांच्या कुटुंबासोबत बाहेर पडले आणि चार किंवा त्यापेक्षा कमी जण असतील, तर काही अडचण नाही. त्यांनी पुढे सांगितले की, निर्बंध असले तरी, मुंबईकरांना त्यांच्या आवडीच्या ठिकाणी गेट वे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी, जुहू, गोराई आणि मढ या ठिकाणी संध्याकाळ पासून जाऊ शकतात. पण छोट्या गटाने, चारपेक्षा कमी लोक असले पाहिजेत. पोलीस या ठिकाणी गर्दी जमू देणार नाहीत, असेही विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले.

गच्चीवर पार्ट्यांना परवानगी नाही
बोटीवर तसेच गच्चीवर पार्ट्यांना परवानगी नाही. नियमांचे उल्लंघन केल्यास आयोजकांवर आणि गर्दीवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती नांगरे पाटील यांनी दिली. छेडछाडीच्या, त्रास देण्याच्या घटना रोखण्यासाठी विविध ठिकाणी पथके तैनात करण्यात येणार आहेत. घातपाताचा धोका लक्षात घेऊन मुंबई पोलीस सज्ज आहे. बेदरकारपणे वाहन चालवणे तसेच ड्रींक अँड ड्राईव्ह विरोधात वाहतूक पोलीस दरवर्षी प्रमाणे मोहिम राबवतील, असेही नांगरे पाटील यांनी सांगितले.