मुंबईवरुन परत येताना महामार्गावर अग्निशमन जवानाची कर्तव्य दक्षता

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन
आज दुपारी तीनच्या सुमारास पुणे – मुंबई द्रुतगती महामार्गावर मुंबईकडे जाणाऱ्या दिशेला “महिंद्रा झायलो” या चारचाकी वाहनाच्या इंजिनमधून धूर येत अागीचा प्रकार होत असल्याचे चालकाच्या लक्षात येताच त्यांनी प्रसंगावधान राखत वाहन रस्त्याच्या बाजूला घेतले. त्यावेळी वाहनामधे लहान मुलांसोबत असणारे दोन कुटूंब मदतीकरिता प्रयत्न करीत होते.

त्याचवेळी मुंबईकडून पुण्याकडे येणारे पुणे अग्निशमन दलाचे जवान संजय शंकर जाधव हे त्यांच्या वाहनाने पुण्याकडे येत होते. सुदैवाने त्यांचे लक्ष बाजूच्या महामार्गावर वाहनाच्या इंजिनमधे आगीचा प्रकार असून वाहनचालक व कुटुंबीय भेदरलेल्या स्थितीत असल्याचे निदर्शनास आले. जवान जाधव यांनी लगेच आपले कर्तव्य लक्षात घेत त्यांचे वाहन थांबवून त्यांच्याकडे वाहनामधे असणाऱ्या अग्निरोधक उपकरण घेऊन ते पलिकडे वाहनाच्या दिशेला धावले. छोट्या अग्निरोधक उपकरणाचा योग्य रितीने वापर करुन त्यांनी शिताफीने आग वाढणार नाही याकडे विषेश लक्ष देत पुढील अनर्थ टाळला.

पुणे अग्निशमन दलाचे जवान जाधव हे सुदैवाने योग्य वेळी तिथे पोहोचले नसते तर पुर्ण वाहनाने पेट घेत मोठी हानी झाली असती. जाधव हे पुणे अग्निशमन दलाकडे कार्यरत असून खेडचे रहिवाशी आहेत.ही घटना रात्रीच्या ड्यूटीस आज ते परतत असताना घडली. त्यांनी केलेल्या कामगिरीने गुजराथचे रहिवाशी असलेले कुटूंब भारावून जात त्यांनी संजय जाधव यांचे आभार मानले.

You might also like