CoWIN प्लॅटफॉर्मवर 18+ लोकांचे होणार ऑन-साईट रजिस्ट्रेशन, जाणून घ्या व्हॅक्सीन घेण्याचे नवीन नियम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसच्या दुसर्‍या लाटेला तोंड देण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने लसीकरणावर जोर देत आहे. सरकारचे लक्ष्य लवकरात लवकर 18 वर्षावरील लोकांना लस देण्याचे आहे. तर, आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, कोविन प्लॅटफॉर्मवर 18+ लोकांसाठी ऑन साईट रजिस्ट्रेशन आणि अपॉईंटमेंट सुरू केले जात आहे. मात्र, ही सुविधा केवळ सरकारी व्हॅक्सीनेशन केंद्रांवरच उपलब्ध असेल.

मंत्रालयाने म्हटले की, ही सुविधा खासगी व्हॅक्सीनेशन केंद्रांसाठी उपलब्ध असणार नाही. संबंधित राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाच्या सरकारांच्या निर्णयावरच या सुविधेचा वापर करता येऊ शकतो. राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना 18-44 वर्ष वयोगटासाठी ऑन-साईट नोंदणी आणि अपॉईंटमेंट केंद्र उघडण्याचा निर्णय घ्यावा लागेल, जेणेकरून व्हॅक्सीन वाया जाणार नाही.

वक्तव्यात म्हटले आहे की, सुरुवातीला 18 ते 44 वयोगटाच्या लोकांसाठी केवळ ऑनलाईन अपॉईंटमेंट मोडच्या सुविधेमुळे लसीकारण केंद्रांवर गर्दी कमी होती. राज्यांनी दिलेल्या विविध सूचनांच्या अंतर्गत केंद्राने आता 18-44 वर्षाच्या लोकांसाठी कोविन डिजिटल प्लॅटफॉर्मवर ऑन-साईट नोंदणीची सुविधा प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे. 1 मे रोजी 18 ते 44 वयोगटासाठी लसीकरणाची सुरूवात झाली होती.

या सोबतच मंत्रालयाने राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना सल्ला दिला आहे की, लसीकरण केंद्रांवर गदी टाळण्यासाठी 18-44 वयोगटासाठी ऑन-साईट नोंदणी आणि अपॉईंटमेंट सुरू करताना अतिशय सावधगिरी बाळगावी.