एक्सप्रेस वे वर १० गाड्या एकमेकांना धडकल्या 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

बोरघाटात भरधाव जाणाऱ्या एका आयशर टेम्पोचे नियंत्रण सुटल्याने तो रस्त्याच्या कडेला असलेल्या रोपला धडकला. त्याच्या पाठोपाठ वेगाने आलेली वाहने एकामेकांवर धडकल्याने सुमारे १० वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. हा अपघात पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या महामार्गावर सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडला. यामुळे एक्सप्रेस वे वर वाहतूक कोंडी झाली आहे. या अपघातात ५ कार, ४ ट्रक आणि एका टेम्पोचा समावेश आहे.

जाहिरात

याबाबत पोलिसांनी सांगितले की, बोरघाटात २ किलोमीटर ३७.८०० वर सकाळी सहा वाजता एक ट्रक आणि कंटेनर यांच्या अपघात होऊन त्यात ट्रकचालकाचा मृत्यु झाला होता. ही वाहने बाजूला काढण्याचे काम सुरु असल्याने महामार्गावरील एक लेन बंद होती. त्यामुळे वाहतूक हळू हळू सुरु होती. अशा वेळी या अपघातापासून सुमारे २ किलोमीटरवर  एक आयशर ट्रक रस्त्याच्या उजव्या बाजूने वेगाने जात असताना त्याचे नियंत्रण सुटले व तो रस्त्याच्या दुभाजकावर असलेल्या रोपाला जाऊन धडकला. या रोपाला धडकल्यानंतर तो पुन्हा पहिल्या व दुसऱ्या लेनमध्ये आला.

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर कारची ट्रकला धडक, २ ठार १ जखमी

त्याच्या पाठोपाठ वेगाने आलेल्या कार्स या एकमेकांवर आदळू लागल्या. त्यांच्या मागोमाग आलेल्या ट्रकही पुढच्या वाहनांना आदळू लागल्या. कोणालाच आपल्या वाहनांवरील नियंत्रण न राखता आल्याने ही सर्व वाहने एकमेकांवर आदळत गेली. त्यात कार्सचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही.

अपघातानंतर तातडीने महामार्ग पोलीस घटनास्थळी आले असून त्यांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला काढली आहेत. आता पहिला आयशर टेम्पो बाजूला काढण्याचे काम सुरु असून दोन लेन सुरु करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.