सावरकरांना ‘कलंक’ म्हणणारे भाजपच्या बाकावर बसलेले, संजय राऊतांचा विरोधकांना ‘टोला’

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – सावरकरांच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणावर तापलेले आहे. हिवाळी अधिवेशनात देखील याचे पडसाद पहायला मिळाले. मात्र ज्या लोकांनी सावरकरांचा उल्लेख ‘कलंक’ असा केला आज तेच लोक भाजपच्या बाकावर बसलेले आहेत असा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. पत्रकारपरिषदेदरम्यान बोलताना राऊत यांनी भाजपच्या अनेक गोष्टीबाबत भाष्य केले.

सध्या सुरु असलेलं हिवाळी अधिवेशन चांगलेच वादळी ठरत आहे. विरोधक शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून मोठा गदारोळ करत आहेत. मात्र विरोधकांनी विधिमंडळ कामकाजाच्या परंपरा पाळाव्यात अशी मागणी राऊत यांनी केली तर सरकारवर अंकुश ठेवण्यासाठी इतर देखील मार्ग आहेत त्याकडे विरोधी पक्षाने पहावे असे देखील राऊत यांनी सांगितले.

तसेच हे सरकार जनहिताचे निर्णय घेण्यासाठी सत्तेत आहे, त्यामुळे नागपुरात महापौरांवर झालेल्या गोळीबाराचा देखील तपास करू असे संजय राऊत म्हणाले. तसेच सध्या नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून देशात अशांतता आहे त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, विद्यार्थ्यांवर बंदुका रोखल्या जाणे हे लोकशाहीला पूरक नाही.

उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजारांची मदत करावी या मागणीसाठी भाजपनं विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केलं आहे. यावेळी भाजप नेत्यांच्या हातात सामनाच्या लेखात छापण्यात आलेल्या मजकूराचे बॅनरही दिसून आली. शेतकऱ्यांसाठी भाजप विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन करत आहे. त्यामुळे अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवसात काही कामकाज होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

फेसबुक पेज लाईक करा –  https://www.facebook.com/policenama/