आता मथुरा आणि वाराणसीतील मंदिरांसाठी लढा देणार : आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी

पोलिसनामा ऑनलाईन – अयोध्या रामजन्मभूमी लढ्याप्रमाणेच मथुरा आणि वाराणसी येथील हिंदू मंदिरे मुक्त करण्याच्या अभियानासाठी आम्ही पुढाकार घेऊ, यासाठी कायदेशीर लढा देणार असल्याचे अखिल भारतीय आखडा परिषदेने जाहीर केले. सर्व 13 आखाडा प्रमुखांची आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली प्रयागराज येथे पार पडलेल्या बैठकीत हा ठराव संमत करण्यात आला.

काशी विश्वनाथ मंदिर व मथुरा येथील कृष्ण जन्मभूमी मुक्त करण्यासाठी आज आम्ही ठराव संमत केला आहे. मुघलशाहीच्या काळात मुस्लिम आक्रमकांनी आणि दहशतवाद्यांनी आमची मंदिरे उद्धवस्त करून, मशिदी व मकबरे बांधले. ज्याप्रमाणे संत समुदायाने अयोध्येतील राम जन्मभूमीसाठी मोहीम राबवली. त्यानुसारच आम्ही वाराणसी व मथुराबाबत करण्याचे ठरवले आहे. वाराणसी व मथुरा येथील हिंदू मंदिरं पाडण्यात आल्याप्रकरणी आखाडा परिषदेच्यावतीने तक्रारी देखील दाखल केल्या जाणार आहेत. असे महंत गिरी म्हणाले. मंदिरे मुक्त करण्यासाठीच्या कायदेशीर लढ्यात आम्ही विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या सारख्या हिंदुत्ववादी संघटनांची देखील मदत घेणार आहोत. आम्हाला विश्वास आहे की या कायदेशीर लढाईचा निकाल आमच्या बाजूनेच लागेल, असे देखील त्यांनी सांगितले.