Pune : कचरा जिरवण्यासाठी मिळकत करात सवलत घेणाऱ्या सोसायट्या पालिकेच्या ‘रडार’वर

पुणे : पुणे महापालिकेने मिळकतकराचे उत्पन्न वाढविण्यासोबतच कचर्‍याच्या व्यवस्थापनासाठी महत्वपुर्ण पाउल उचलण्याची तयारी सुरू केली आहे. यामध्ये मोठ्या सोसायट्यांना सोसायटीच्या आवारातच कचरा जिरविण्याचे बंधनकारक करण्यात येणार आहे. तर कचर्‍याचे प्रकल्प दाखवून ज्या सोसायट्यांमध्ये मिळकतकरात पाच टक्के सवलत घेतली जाते अशा सोसायट्यांचे ऑडीट करून प्रकल्प बंद असलेल्या सोसायट्यांची ‘सवलत’ काढून घेतली जाणार आहे.

महापालिकेने मिळकतकराचे उत्पन्न वाढविण्यासाठी महत्वपुर्ण पावले उचलली आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर महापालिकेच्या कर्मचार्‍यांनी बर्‍यापैकी सर्व मिळकतींना भेट दिली आहे. यासोबतच कर आकारणी न झालेल्या मिळकती शोधण्यासाठी महापालिकेने स्वतंत्र ४०० कर्मचारी नेमले आहेत. हे कर्मचारी प्रत्येक मिळकतींना भेट देउन कर आकारणी झाली की नाही , वापरातील बदल याची तपासणी करून कर आकारणी करणार आहेत. या कर्मचार्‍यांना यासोबतच १०० सदनिकांच्या सोसायट्यांमध्ये नियमानुसार सोसायटीच्या आवारातच कचरा जिरवला अथवा त्यावर प्रक्रिया केली जाते की नाही याची माहिती घेणार आहेत. तसेच यापुर्वी ज्या सोसायट्यांनी गांडूळ खत प्रकल्प व कचर्‍यावरील अन्य प्रकल्प राबविले आहेत व मिळकत करात ५ टक्के सूट घेतात त्या सोसायट्यांमध्ये हे प्रकल्प सुरू आहेत की नाही याचीही खातरजमा करणार आहेत. याचा ताळमेळ स्वच्छ संस्थेसारख्या स्थानीक कचरा वेचकांकडून घालण्यात येणार आहे. ज्या सोसायट्यामधील प्रकल्प बंद असतील, त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली.

You might also like