प्रजासत्ताक दिनी अंगावर रॉकेल ओतून महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – आपल्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार देऊन ही न्याय मिळत नसल्याने एका महिलेने सातार जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहणावेळी आत्महदहनाचा प्रयत्न केला. जिल्हाधिकारी कार्यालयात तैनात असलेल्या पोलिसांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी या महिलेला ताब्यात घेतले.

या प्रकारामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात एकच खळबळ उडाली.सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहणावेळी एका महिलेने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. पोलिसांनी वेळीच या महिलेला ताब्यात घेतल्यामुळे अनर्थ टळला. आपल्यावर अन्याय होत असताना पोलीस तक्रार घेण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप या महिलेने केला आहे. ही महिला जांब येथील रहिवासी असून गावातील एक व्यक्ती सतत त्रास देतो मात्र अनेकवेळा तक्रारी देऊनही पोलीस दुर्लक्ष करत असल्याचा आरोप महिलेने केला आहे.

या महिलेने जांब येथील एका व्यक्तिविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणात संबंधीत व्यक्तीवर कोणतीही कारवाई केली नाही. विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्यामुळे त्या व्यक्तीकडून सतत त्रास दिला जात आहे. पोलिसांना याची माहिती देऊन ही कोणतीच कारवाई होत नसल्याचे या महिलेचे म्हणणे आहे.