गुजरातमध्ये पुन्हा संतापजनक प्रकार ! ‘मेडिकल’ करण्यासाठी 100 प्रशिक्षणार्थी महिला कर्मचार्‍यांना केलं ‘विवस्त्र’

सुरत : वृत्तसंस्था  – गेल्याच आठवड्यात गुजरातमधील भुज जिल्ह्यातील मुलींच्या हॉस्टेलमध्ये ६८ मुलींना मासिक पाळी शोधण्यासाठी विवस्त्र करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. यावरून मोठा गदारोळ माजलेला असताना, त्याच गुजरातमध्ये सुरत महापालिकेच्या ट्रेनी महिला कर्मचाऱ्यांसोबत असाच एक प्रकार घडला आहे. अविवाहित महिलांना आक्षेपार्ह प्रश्नही विचारण्यात आले आहेत.

हे प्रकरण राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या सुरत महापालिकेच्या एका रुग्णालयातील आहे. एसएमसी कमर्चारी संघाने याबद्दलची तक्रार महापालिका अधिकाऱ्याकडे केली आहे. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला आहे. महापालिकेच्या १०० ट्रेनी कर्मचाऱ्यांना एका आवश्यक फिटनेस टेस्टसाठी सुरत शहर संशोधन संस्थेमध्ये नेण्यात आले होते. या वेळी महिला ट्रेनी क्लर्कना १०-१० च्या गटाने विवस्त्र उभे राहण्यास सांगितले, आणि त्यांच्या खाजगी आयुष्यावर देखील त्यांना प्रश्न विचारण्यात आले.

या विषयी बोलताना एका महिला कर्मचारी म्हणाली की, ज्या ठिकाणी आम्हाला विवस्त्र उभे केले होते , त्या ठिकाणच्या खोलीचा दरवाजा सुद्धा नीटपणे बंद केला नव्हता, खोलीत फक्त एक पडदा लावलेला होता. तिथे महिलांसोबत अभद्र व्यवहार होत होते, अविवाहित महिलांना तुम्ही गर्भवती झालेला का ? असे अश्लील प्रश्न देखील विचारण्यात येत होते. तेथील चाचणी घेणाऱ्या डॉक्टरांवर अश्लील व्यवहार केल्याचा आरोप महिला कर्मचाऱ्यांनी केला आहे.

रुग्णालयाच्या मार्गदर्शक तत्वानुसार महिलांची शारीरिक तपासणी केली जाते. पुरुषांसाठी अशा प्रकारची चाचणी घेतली जाते की नाही ते माहिती नाही, परंतु महिलांसाठी या नियमांचे पालन करावे लागतेच. यामध्ये कोणत्याही महिलेला कसला रोग नाही ना यांची तपासणी केली जाते असे हॉस्पिटलच्या स्त्री रोग विभाग प्रमुख अश्विन वछानी यांनी सांगितले.

You might also like