Budget 2021 : महिला, जनसामान्यांच्या हाती पुन्हा वाटाण्याच्या अक्षता – राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रातील महिला, जनसामान्यांच्या हाती पुन्हा वाटाण्याच्या अक्षता आल्या आहेत, असे म्हणत केंद्रीय अर्थसंकल्पावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी टीका केलीय.

महिलांच्या योजनांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये भरीव काहीही दिसत नाही. त्यामुळे देशातील महिलांची पूर्णपणे निराशा झालीय. महिलांसाठी असलेल्या योजना तसेच उपक्रमांसाठी केंद्र सरकारने हळूहळू अनुदान बंद करण्याची पद्धती अवलंबिलीय. हे आताच्या या अर्थसंकल्पामुळे शिक्कामोर्तब झाले आहे, असे दिसून येत आहे.

उज्ज्वला गॅस योजनेचा विस्तार केला जाणार आहे. 1 कोटी लोकांना अजून त्याचा लाभ मिळेल, असे म्हटलंय. पण, सध्या असलेली दरवाढ कंबरडे मोडणारी आहे. अनेक शासकीय कंपन्या विकण्याचा झपाटा या केंद्र सरकारने लावलाय. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला यापुढील काळात जगणे मुश्किल होणाराय. सर्व क्षेत्राचे खासगीकरण झाले तर सरकारनेही सत्तेत राहू नये. त्या कारभाराचेही खासगीकरण करावे.

आयकर रचनेत कोणतेही बदल न झाल्याने मध्यमवर्गीय आणि नोकरदार कमालीचे नाराज आहेत. कृषी क्षेत्रासाठी केवळ 3 हजार कोटींची वाढ करून शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. जीएसटीच्या यंत्रणेतील दोष अजून दूर झाले नाहीत. या यंत्रणेमुळे लहान व्यापारी जेरीस आलेेत. या सदोष यंत्रणेचा त्यांना अकारण आर्थिक फटका सोसावा लागतोय.

जीएसटीचे दर कमी करून ग्राहकांना खरेदीसाठी प्रोत्साहन देण्याची आणि बाजारातील मागणी वाढवण्याची आवश्यकता होती. त्यादृष्टीनेही अर्थसंकल्पामध्ये ठोस पावले उचलण्यात आलेले नाहीत.अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्र शोधावा लागतो. मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्यांक बांधवांवर अन्याय करण्याची परंपरा, या अर्थसंकल्पातही कायम आहे. महिलांच्या योजनांसाठी अर्थसंकल्पामध्ये भरीव काहीही दिसत नाही. प्राप्तीकर उत्पन्न मर्यादेत वाढ होऊन दिलासा मिळण्याची अपेक्षा असलेल्या मध्यमवर्गीयांच्या भावना संतप्त आहेत.

देशाच्या तिजोरीमध्ये सर्वाधिक महसूल देणार्‍या महाराष्ट्रावर अर्थसंकल्पात यावेळीही अन्याय झाल्याचे दिसून येत आहे, असे मत रूपाली चाकणकर यांनी व्यक्त केलंय.