अवघ्या 3 वर्षांच्या मुलाला कोरोनाची ‘लागण’, संक्रमित रूग्णांच्या संख्येत ‘वाढ’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. अशात भारतात देखील विषाणू ग्रस्तांची संख्या वाढत आहे. भारतात ही संख्या ४० वर पोहोचली आहे. केरळमधील ३ वर्षांच्या मुलाला कोरोना विषाणूची लागण झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. नुकताच इटलीच्या प्रवासावरून आलेल्या या तीन वर्षाच्या मुलाची तपासणी केल्यास विषाणू सक्रिय असल्याचे समोर आले आहे. त्यास पुढील उपचाराकरता एर्नाकुलम मेडिकल कॉलेजच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं आहे.

दरम्यान, रविवारी कोरोना विषाणूची लागण झालेली ५ प्रकरणे समोर आली होती. केरळचे आरोग्यमंत्री के.के.शैलजा यांनी सांगितले की, ‘कोरोना विषाणूग्रस्त पाच नवीन रूग्णांना आयसोलेशन वॉर्डमध्ये भर्ती करण्यात आलं आहे.’ केरळमधील तीन लोकं नुकतेच इटलीहून भारतात परतले असून पतनमथिट्टा जिल्ह्यातील दोन लोकांना या विषाणूची लागण झाली आहे.

आता भारतात देखील कोरोना विषाणूमुळे भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे, कारण केरळमध्ये देखील कोरोनाचे ५ रुग्ण आढळले आहेत. भारतात जवळपास विषाणूग्रस्त लोकांची संख्या ही ४१ वर पोहोचली आहे. त्यामुळे धुळवडीचा रंग बेरंग होताना दिसत आहे. तसेच केरळच्या आरोग्य मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे की कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार सुरू आहेत असे त्यांनी सांगतले.