2 कोटींच्या दरोड्यातील ‘मुख्य सुत्रधार’ 4 वर्षांनी ‘जाळ्यात’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सेनापती बापट रोडवरील लाईफ जनरल इन्श्युरन्स कंपनीवर दरोडा टाकून 2 कोटी रुपये चोरुन नेणाऱ्या टोळीचा मुख्य सुत्रधार पुणे पोलिसांच्या विशेष पथकाच्या जाळ्यात तब्बल 4 वर्षांनी आला आहे. संजय चंद्रकांत गंभीर असे त्याचे नाव आहे. या दरोडा प्रकरणी पोलिसांनी यापूर्वी 11 जणांना अटक केली होती. मात्र, संजय गंभीर हा मुख्य सुत्रधार पोलिसांच्या हाती लागत नव्हता.

गुन्हे शाखेकडून पुणे शहरातील फरार आरोपींच्या शोधाकरीता सहायक पोलीस आयुक्त शिवाजी पवार यांच्या अधिपत्याखाली विशेष पथक स्थापन केले आहे. या पथकातील पोलीस नाईक महेश निंबाळकर यांना संजय गंभीर हा बाणेर रोडवरील सकाळनगरमधील हॉटेल चारुज येथे येणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरुन महेश निंबाळकर व संभाजी नाईक यांनी हॉटेल चारुजवर सापळा रचून त्याला पकडले. चौकशीत त्याने गुन्हा कबुल केला.

लाईफ जनरल इन्श्युरन्स अँड ब्रोकरेज या सेनापती बापट रोडवरील कंपनीचे मालक साईराम अय्यर यांनी कंपनीच्या कामासाठी मुंबईला ऑफिस घ्यायचे होते. त्याच्या व्यवहारासाठी 1 जून 2015 रोजी 2 कोटी रुपयांची रक्कम ऑफिसमध्ये आणली होती. ऑफिसमधील सेल्स कर्मचारी मनोज एलपूर (रा. पिंपरी) याला माहिती होती. त्याने मित्रांच्या मदतीने ही रक्कम चोरीचा कट आखला. 9 जून 2015 रोजी सायंकाळी धाडसी दरोडा टाकून ऑफिसमधील 1 कोटी 97 लाखांची रोकड चोरुन नेली होती. चतु:श्रृंगी पोलिसांनी मनोज एलपूर, चंद्रकांत बेलवटे (रा. चिंचवड), अमित सांगळे (रा. निगडी) व इतर आठ अशा 11 जणांना अटक केली होती. दरोडा टाकल्यानंतर संजय गंभीर फरार झाला होता.

संजय गंभीर याच्यावर यापूर्वी बॅक ऑफ महाराष्ट्रकडे जप्त केलेल्या मालमत्ता निम्या किंमतीत मिळवून देतो, असे सांगून 11 साथीदारांसह नागरिकांना 2 कोटी रुपयांची फसवणूक केली होती. याप्रकरणी 2012 मध्ये त्याला अटक झाली होती. याशिवाय 2011 मध्ये टेक महिंद्रा कंपनीमध्ये नोकरी लावून देतो, असे सांगून लोकांकडून पैसे घेऊन नोकरी न लावता फसवणूक केल्याबाबत गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात संजय गंभीर गेली 9 वर्षे फरार आहे.

अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त बच्चनसिंग, सहायक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक महेश निंबाळकर, संभाजी नाईक, महेश पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –