पोलीस भरती घोटळ्यात १ वर्षापासून फरार असलेला गुन्हे शाखेच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक २ मध्ये सशस्त्र पोलीस भरती घोटाळ्यातील मागील एक वर्षापासून फरार असलेल्या एकाला गुन्हे शाखेच्या युनीट ५ च्या पथकाने अटक केली.

तेजस राजेंद्र नेमाडे (वय २३, सिंहगड रोड पुणे, मुळ कारंजा रोड, मुर्तीजापूर जि. अकोला) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक २ मध्ये १२ मार्च २०१८ ते २१ एप्रिल २०१८ दरम्यान पार पडलेल्या पोलीस भरती प्रक्रियेत राज्य राखीव पोलीस दलातील काही पोलीस व भरती प्रक्रियेतील उत्तरपत्रिका तपासणी करण्याचे टेंडर दिलेल्या कंत्राटदार कंपनीच्या काही कर्मचाऱ्यांनी घोटाळा केला होता.

त्यांनी निवड प्रक्रियेतील लेखी परीक्षेत उत्तर पुत्रिकेत फेरफार करून बनावटीकरण करून गुण वाढविले होते. त्यानंतर याप्रकरणी राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक २ च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा तपास युनीट पाचचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण करत आहेत.

दरम्यान यापुर्वी पोलिसांनी राज्य राखीव पोलीस दलातील २ कर्मचारी व ओएमआऱ शीट तपासणी करणाऱ्या २ जणांना अटक केली हे. त्यातील मुख्य आरोपी प्रवीण भटकर, त्याचे साथीदार भुषण निरंजराव देऊलकर, तेजस राजेंद्र नेमाडे हे मागील एक वर्षापासून फरार होते.

त्यातील नेमाडे याच्या वडीलांचे अमरावती येथे निधन झाल्याने तो तेथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याला तेथून १७ मे रोजी अटक केली.त्यानंतर त्याला लष्कर न्यायालयात हजर करण्यात आले. तेव्हा त्याला २४ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर त्याचे इतर फरार साथीदार प्रवीण भटकर, भुषण देऊलकर, यांचा पोलीस शोध घेत आहेत.

ही कारवाई अप्पर पोलीस आय़ुक्त प्रदिप देशपांडे, पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आय़ुक्त भानुप्रताप बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे, पोलीस उपनिरीक्षक शेंडगे, सहायक पोलीस फौजदार लक्ष्मण शिंदे, कर्मचारी संतोष मोहिते, समीर शेख, सचिन घोलप, राजेंद्र भोरडे, केरबा गलांडे, दया शेगर, अंकुश जोगदंडे, संजयकुमार दळवी यांच्या पथकाने ही कारवाई केली.