भागीदारांनी फसवणूक करुन घेतले दीड कोटीचे कर्ज

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – फर्मचा राजीनामा दिल्यानंतरही कार्यालयात असलेल्या कागदपत्रांचा उपयोग करुन भागीदारांनी बँकेमधून दीड कोटी रुपयांचे कर्ज घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वाकड पोलिसांनी ऑर्बिस रिसच फर्मचे राहुल सहदेव जाधव (वय ३४, रा. पार्क रॉयल सोसायटी, रहाटणी) व फर्मच्या इतर सदस्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत रणजित राजेंद्र डेंगळे (वय ३१, रा. एमआयडीसी, शाहुनगर, चिंचवड) यांनी वाकड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार रहाटणी येथील ऑर्बिस रिसर्च कार्यालयात २४ जानेवारी ते ३ डिसेंबर २०१८ दरम्यान घडला होता.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, रणजित डेंगळे आणि राहुल जाधव यांनी एकत्रितरित्या भागीदारीमध्ये  ऑर्बिस रिसर्च नावाची फर्म चालवित होते. यावेळी डेंगळे यांनी वैयक्तिक कागदपत्रे फर्ममध्ये विश्वासाने ठेवली होती. डेंगळे यांनी फर्मचा राजीनामा दिल्यानंतर राहुल जाधव व इतरांनी संगनमत करुन ती कागदपत्रे वेगवेगळ्या चार बँकांमध्ये सादर करुन त्या कागदपत्रांवर डेंगळे यांची बनावट सही करुन त्यांच्या नावावर १ कोटी ५२ लाख रुपयांचे कर्ज घेऊन डेंगळे यांची फसवणूक केली.

Visit : policenama.com