‘कोरोना’च्या विरुद्ध लढण्यासाठी चितळे उद्योग समूहाकडून दीड कोटीची मदत जाहीर

पोलीसनामा ऑनलाइन –  देशासह राज्यात पसरलेल्या कोरोनाच्या महामारीसाठी चितळे उद्योग समूहाकडून दीड कोटीच्या मदतीचा धनादेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. आपत्तीत मदतीसाठी पुढे येणार्‍या चितळे उद्योग समूहाने कोरोना संसर्गाच्या अभूतपूर्व संकटातही समाजासाठी मदतीचा हात दिला आहे. या उद्योग समूहातील ‘बी. जी. चितळे’ यांच्याकडून मुख्यमंत्री मदतनिधीसाठी एक कोटी तर पुण्यातील ‘चितळे बंधू मिठाईवाले’ यांच्याकडून पंतप्रधान मदतनिधीसाठी पन्नास लाख रुपये दिले. दोन्ही मदतीचे धनादेश सांगलीचे जिल्हाधिकारी चौधरी यांच्याकडे देण्यात आले. या वेळी श्रीपाद चितळे, विश्वास चितळे, गिरीश चितळे, निखिल चितळे हे उपस्थित होते.

देशातील विविध राज्यात कोरोनामुळे हाहाकार माजला आहे. त्यामुळे सामाजिक बांधीलकीच्या भावनेतून हा निधी दिल्याचे श्रीपाद चितळे यांनी सांगितले. चितळे उद्योग समूह अत्यावश्यक सेवेशी निगडित असल्याने सामाजिक बांधीलकीतून आम्ही तो त्याच कार्यक्षमतेने सुरू ठेवला आहे. हे करताना आम्ही कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी योग्य ती सर्व काळजी घेत आहोत. या दूध पुरवठयाच्या सेवेसाठी प्रशासनाकडूनही आम्हाला संपूर्ण सहकार्य होत असल्याचे चितळे यांनी सांगितले.