काय सांगता ! होय, मुंबईत 1.5 लाख घरे विक्री विना पडून !

पोलीसनामा ऑनलाईन टीम – मुंबईत आतापर्यंत दीड लाख घरे विक्रीविना पडून असून गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात वाढ झाली आहे. लॉकडाउनचा फटका घरविक्रीला बसला असून नजीकच्या काळात त्यात घट होण्याची शक्यता नाइट फ्रँकच्या अहवालात वर्तविण्यात आला आहे.

घरांच्या किमती कागदावर कमी झाल्याचे दिसत नसले तरी विकासक पातळीवर सवलती देत आहेत. त्यामुळे 10 ते 20 टक्क्यांपर्यंत किमती कमी झाल्या असाव्यात, असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.
गेल्या वर्षअखेर मुंबईत एक लाख 36 हजार घरे विक्रीविना पडून होती. मध्य मुंबईत सहा हजार 418 घरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मात्र यामध्ये प्रामुख्याने आलिशान घरांचा समावेश आहे. ही घरे पुढील नऊ वर्षे विकली जाण्याची शक्यता नाही, असा अंदाजही नाइट फ्रँकच्या राष्ट्रीय संचालक व संशोधन प्रमुख रजनी सिन्हा यांनी वर्तविला आहे. दक्षिण मुंबईत दोन हजार 321, पश्चिम उपनगरात 26 हजार 245 तर पूर्व उपनगरात 29 हजार 355 घरे रिक्त आहेत. ठाण्यात 24 हजार 672 तर नवी मुंबईत 26 हजार 462 घरे ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत.

जानेवारी ते जून 2020 या सहामाहीमध्ये मुंबईतील निवासी जागांच्या बाजारपेठेतील घरांची विक्री 45 टक्के घटली आहे. नवनवे निवासी प्रकल्प सुरू होण्याचे प्रमाण 47 टक्के इतके घसरले. या काळात 23 हजार 399 घरे विकली गेली. विक्रीचा वेग मंदावल्याने बृहन्मुंबई क्षेत्रासाठी एकूण उपलब्ध घरांपैकी विक्रीविना पडून राहिलेल्या घरांची संख्या 9.3 वरून 10.8 टक्क्यांपर्यंत वाढली, असेही सिन्हा यांनी सांगितले. या काळात घरांच्या सरासरी किमतीमध्येही घट झाली असून ग्राहकांना घासाघीस करून 18 टक्के किंवा त्याहून अधिक सवलतीही मिळत असल्याचे दिसत असल्याचे त्यांनी नोंदवले आहे. लॉकडाउनमुळे भारतावर झालेला आर्थिक परिणाम आणि यंदाच्या वर्षांतील जागतिक मंदीचे भाकीत यामुळे मालमत्ता भाडेपट्टयाने देण्याचे व्यवहार मंदावणार आहेत.