मेड सर्विस पुरविण्याच्या बहाण्याने हवाई दलातील अधिकाऱ्याला फसविणाऱ्याला बेड्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – मेड सर्विस (घरकामासाठी नोकर) पुरविण्याच्या बहाण्याने हवाई दलातील अधिकाऱ्यासह ३५ जणांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी फसवणूक करून गोव्याला पळून जाण्याच्या बेतात असलेल्या आरोपीला सायबर गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.

विक्रम अत्तार सिंग (वय ३२, रा. काळेपडळ, हडपसर) याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पश्चिम बंगालमध्ये हवाई दलात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याने फिर्याद दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हवाई दलात अधिकारी आहेत. त्यांची नियुक्ती सध्या पश्चिम बंगाल येथे आहे. त्यांचे आई वडील पुण्यात राहतात. ते वयोवृध्द असल्याने त्यांना घऱकामासाठी मेड़ची आवश्यकता होती. त्यांनी यासंदर्भात एका वेबसाईटवर चौकशी केली. त्यावेळी रुद्रसाई एंटरप्रायजेसकडून मेड सर्विस पुरविली जात असल्याचे समजले.

त्यानंतर त्यांनी मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा सिंगने त्यांना सुश्रृषेसाठी सेविकेचे मानधन तसेच कमिशन पोटी आर. एस. एंटरप्रायजेस नावाच्या बँक खात्यावर २६ हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी त्याच्या खात्यात पैसे भरले. मात्र त्यांच्या घरी मेड आली नाही. त्यामुळे त्यांनी सिंग याच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा मोबाइल बंद होता. त्यानंतर त्यांनी पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडे धाव घेतली. त्यांनी तांत्रिक तपास केला तेव्हा सिंगने फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान सिंग हा मुळचा राजस्थानचा आहे.

परंतु तो गोव्याला पळून जाण्याच्या तयारीत असतानाच त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने ३० ते ३५ जणांची फसवणूक केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चार मोबाइल आणि १ डेबिट कार्ड असा जप्त करण्यात आला. मेड सर्विसेस पुरवण्याच्या बहाण्याने सिंगने शहरातील आणखी काहीजणांची फसवणूक केल्याची शक्यता आहे. तक्रारदारांनी पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ही कारवाई सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहाय्यक आयुक्त निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राधिका फडके, पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, उपनिरीक्षक सागर पडवळ, राहुल हंडाळ, शिरीष गावडे,संतोष जाधव, शीतल वानखेडे आदींनी केली.