धक्कादायक! बनावट जातीच्या दाखल्यावर मिळवले पोलीस उपनिरीक्षक पद

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – वंचितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भारतीय प्रजासत्ताकाबरोबर आरक्षणाची तरतूद करण्यात आली. या तरतुदी नुसार भारतात नोकरी, शिक्षण आणि राजकारणात आरक्षण देण्यात आले. परंतु याच आरक्षणाचा गैर फायदा घेण्याचे प्रकार देशात घडू लागले. असेच एक जात चोरण्याचे प्रकरण प्रकाशात आले आहे. बनावट जात दाखल्याच्या आधारावर राज्य सेवा आयोगाचे पोलीस उपनिरीक्षक पद बळकावण्याचा प्रकार केला आहे. किरण राजेंद्र सोलगे असे या जातीच्या दाखल्याचा गैरव्यवहार करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.

आरोपी किरण सोलगे हा २५ वर्षीय तरुण हा मूळचा रानार सोलगे मळा ता. इचलकरंजी येथील रहिवासी आहे. या आरोपीच्या विरोधात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने केलेल्या कार्यवाहीत सर्व प्रकार उघड झाला आहे. तसेच शाहूपुरी पोलीस ठाण्यात या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मूळचा हिंदू धनगर असलेल्या या आरोपीने अनुसुचित जातीचा दाखला काढला. २०१६ साली झालेल्या राज्यसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण होत हे पद मिळवले. कागदपत्रांच्या पडताळणीत आरोपी किरण सोलगेचे जातीचे प्रमाणपत्र बनावट असल्याचे उघड झाल्यावर त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करण्यात आली.