कर्ज मंजूर करून देण्याच्या बहाण्याने महिलेला ११ लाखांना फसविणाऱ्याला बेड्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – कर्ज मंजूर करून देण्याच्या अमिषाने पुण्यातील महिलेची ११ लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या एकाला सायबर गुन्हे शाखेच्या पथकाने दिल्लीतून अटक केली.

भरतकुमार जयनाथ गुप्ता (वय ३२,रा. दिल्ली) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत विश्रांतवाडीतील एका महिलेने पोलिसांत तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्ता याने काही महिन्यांपूर्वी महिलेच्या मोबाइलवर संपर्क साधला. त्यानंतर त्याने नामवंत बँकेतून बोलत असल्याची बतावणी करून महिलेला पन्नास लाखांचे कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखविले होते. त्यानंतर त्यांना कर्ज मंजूर करून देण्याच्या बहाण्याने वेळोवेळी ११ लाख १९ हजार रूपये खात्यात भरण्यास लावले. त्यानंतर फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यावर महिलेने याप्रकरणी पोलीसांकडे धाव घेतली. त्यानंतर अज्ञात मोबाईलधारकाविरोधात माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सायबर गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा समांतर तपास करण्यात येत होता. पथकाने तांत्रिक विश्लेषण केले. तेव्हा गुप्ताने फसवणूक केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांचे पथक दिल्लीला रवाना झाले. त्यांनी गुप्ताला दिल्लीतून अटक केली. पुढील तपासासाठी त्याला विश्रांतवाडी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले.

पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राधिका फडके, पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, संतोष बर्गे, सहाय्यक निरीक्षक धावटे, बाबासाहेब कराळे, नितेश शेलार, अस्लम अत्तार, संतोष जाधव आदींनी ही कारवाई केली.

Loading...
You might also like