व्यापाऱ्यांचे खंडणीसाठी अपहरण करणाऱ्या खंडणीखोराला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पिस्तूलाचा धाक दाखवून गाडीतून अपहरण करून खंडणी मागणाऱ्या व खंडणी नाही दिल्यास मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे.

गणेश दिलीप मोडक (वय २४, रा. वडकीगाव,हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

हडपसर परिसरातील लालाराम घिसाराम चौधरी यांना रात्री साडेआठच्या सुमारास मयूर उत्तम मोडक व गणेश मोडक या दोघांनी बोलवून त्यांच्या स्विफ्ट कारमध्ये डांबले. त्यानंतर पिस्तूलाचा धाक दाखवून पोलिसांत तक्रार दिल्याचा जाब विचारत दरमहा ५० हजार रुपये हप्ता मागितला. त्यानंतर त्यांना कोयता उलटा करून पोटावर आणि पाठीवर मारहाण केली. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी मयूर मोडक याला अटक केली.

तर त्याचा साथीदार गणेश मोडक हा फरार होता. तो मागील एक वर्षापासून पोलिसांना चकामा देत होता. फरार असतानाही त्याने हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंतरवाडी फाटा येथे एका किराणा दुकानमालकाला कारमध्ये डांबून ठेवले. त्यानंतर त्यांना एक लाखांची खंडणी मागितली होती. याप्रकऱणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यागुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसाना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, गणेश मोडक हा त्याच्या वडकी येथील घरात असून त्याच्या खोलीला बाहेरून कुलुप आहे. त्यानंतर फुरसुंगी बीट मार्शल यांनी त्याचा शोध घेऊन अटक केली.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त सुनील फुलारी, पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त सुनील देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हडपसर पोलिसांच्या पथकाने केली.