पिस्तूलाच्या धाकाने अपहरण करत लुबाडणाऱ्या टोळीतील एकाला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – शस्त्राचा धाक दाखवून अपहरण करत पैसे, सोनं लूबाडत बेदम मारहाण करणाऱ्या टोळीतील एकाला अटक करण्यात आली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला होमगार्डचे प्रशिक्षण घेत असताना शिवाजीनगर येथून ताब्यात घेतले आहे.

अजित मधुकर गव्हाणे (वय २३, भीमा कोरेगाव ता. शिरूर जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर त्याच्या दोन साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहूल शिवाजी झोडगे हे त्यांच्या कारने आयटीसी गोडावून मधून घरी जाण्यासाठी निघाले तेव्हा एपीपीएल कंपनीसमोरील रस्त्यावर आल्यावर त्यांना दुचाकीवरून आलेल्या तिघांनी अडवले. त्यानंतर त्यांना मराहणा करत पिस्तूलाचा धाक दाखवून पळवून नेत त्यांच्याकडील सोने, एटीएम कार्ड काढून पळ काढला. त्यानंतर याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून तपास सुरु होता. त्यावेळी हा गुन्हा अजित गव्हाणे, सागर नवनाथ पिंगळे (२३), प्रथमेश उर्फ सोन्या सतिश मिडघुले (२१) या तिघांनी केला असल्याचे  समोर आले. त्यावेळी त्यांचा शोध घेतल्यावर अजित गव्हाणे हा पुण्यात होमगार्डचे प्रशिक्षण घेत असल्याचे समोर आले. त्यावेळी त्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीने त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. तेव्हा त्याने हा गुन्हा केल्याचे कबूल केले. त्याला शिक्रापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पोलीस अधिक्षक संदिप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने, सहायक पोलीस फौजदार दयानंद लिमन, गिरीमकर, कर्मचारी मोरेश्वर इनामदार, सचिन गायकवाड, विशाल साळुंके, राजू मोमीन, पोपट गायकवाड, बाळासाहेब खडके, समाधान नाईनवरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

You might also like