भांडणात विवाहितेचा विनयभंग; एकाला अटक

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – मोशी येथे सासू सासऱ्यांसोबत सुरु असलेली भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या महिलेचा विनयभंग केल्याची घटना गुरुवारी (दि. २०) दुपारी दीडच्या सुमारास मोशी येथे घडली.

याप्रकरणी २७ वर्षीय महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तर गौरव रंगनाथ म्हस्के (रा. मोशी प्राधिकरण) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गौरव फिर्यादी महिलेच्या सासू सास-यांसोबत वारंवार किरकोळ कारणावरून भांडण करत होता. गुरुवारी पुन्हा आरोपीने भांडण केले. त्यावेळी आरोपीचे नख लागून फिर्यादी यांच्या सासू जखमी झाल्या. ही भांडणे सोडविण्यासाठी फिर्यादी गेल्या असता आरोपीने त्यांना ढकलून दिले.

तसेच त्याने फिर्यादी महिलेचा पाठलाग करून हात पकडला आणि अश्लील वर्तन केले. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करीत आहेत.