स्कॉचच्या बाटलीत व्हिस्की, होम डिलीव्हरी देणारा अटकेत

राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाची कामगिरी

पुणे : पोलीसनामा ऑनालाईन – उच्चभ्रु ब्रॅंडच्या स्कॉचच्या बाटलीत व्हीस्कीची भेसळ करून महाविद्यालयीन तरुण आणि आयटीतील अभियंत्यांना ऑनलाईन दारू विक्री करणाऱ्या एकाला राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून व्हिस्कीच्या एक लिटर क्षमतेच्या ६७ बाटल्या ५०० रिकाम्या बाटल्या, २ हजार बुचं, २६० लेबल, ९५० कव्हर असा ११ लाख ३९ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नागा डाया चावडा (३५, पिंपळे गुरव) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अवैध व बनावट दारू विक्रीवर राज्य उत्पादन शुल्कच्या पथकांकडून वॉच ठेवली जात आहे. दरम्यान अवैध बनावट स्कॉचची विक्री व वाहतुक होत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानंतर पिंपळे गुरव परिसरातील महाराष्ट्र बँकेजवळ सापळा लावून नागा चावडा याला ताब्यात घेण्यात आले. त्यावेळी त्याच्याकडे दोन स्कॉचच्या बाटल्या मिळून आल्या. तेव्हा त्याच्याकडे चौकशी केल्यावर तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. त्यामुळे त्याच्या घरी जाऊन तपासणी केल्यावर उच्च प्रतिच्या स्कॉचच्या बाटल्यांमध्ये व्हीस्कीची भेसळ करून ती विकली जात असल्याचे समोर आले.

तो महाविद्यालयीन तरुण, आयटी अभियंते आणि इतरांना ही दारू विक्री करत होता. स्कॉच आणि व्हीस्कीच्या दरात जवळपास दुप्पट फरक आहे. तो पाच ते सहा महिन्यांपासून मुद्द्याची होम डिलीव्हरी करत होता.

ही कारवाई निरीक्षक अे.बी.पवार, उप निरीक्षक एस.आर.दाबेराव, सचिन भंबड, तसेच दत्ता गवारी, स्वप्नील दरेकर, महेंद्र कदम, प्रिया चंदनशिवे, शशांक झिंगळे यांच्या पथकाने केली.