एसआरपीएफ (SRPF) भरती प्रक्रियेत डमी उमेदवार उभा करणारा गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – राज्य राखीव दलाच्या (SRPR) भरती दरम्यान डमी उमेदवाराकडून लेखी आणि शारिरीक परिक्षा देऊन फसवणूक करणाऱ्या आरोपीला दीड वर्षांनी वानवडी पोलिसांनी अटक केली. आरोपीने एप्रील २०१७ मध्ये झालेल्या भरती प्रक्रियेदरम्यान डमी उमेदवाराकडून परिक्षा दिल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.

त्यानंतर आरोपीवर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला झाला होता. आरोपीला मंगळवारी (दि.२५) रात्री नऊच्या सुमारास जुन्नर तालुक्यातील डिंगोरे गावातून अटक करण्यात आली आहे. तर एकजण अद्याप फरार आहे.दिपक तुकाराम पानसरे (वय-२६ रा. नगर कल्याण रोड, मु.पो. डिंगोरे, ता. जुन्नर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

तर अभिजीत महादेव चव्हाण (रा. मु.पो. पाधीर वाडी, ता. जुन्नर) हा फरार आहे. याप्रकरणी वानवडी येथील एसआरपीएफ ग्रुप नं. २ चे पोलीस निरीक्षक वैजनाथ शामराव चव्हाण यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ एप्रिल २०१७ रोजी झालेल्या एसआरपीएफ भरती प्रक्रीयेचे कामकाज पाहण्यासाठी फिर्यादी आणि त्यांचे सहकारी पोलीस उप निरीक्षक पवार यांची नियुक्ती करण्यात आली होती. आरोपी दिपक पानसरे याने भरती प्रक्रियेत प्रवेश मिळवला होता. २५ एप्रिल रोजी झालेल्या लेखी परिक्षेत आरोपीने डमी उमेदवार बसवला.

तसेच १ एप्रिल रोजी घेण्यात आलेल्या शारिरीक परिक्षत देखील डमी उमेदवाराला उभे केले होते. फिर्यादी यांनी दोन्ही दिवसांचे व्हिडीओ रेकॉर्डींग तपासले असता दिपक पानसरे याच्या उमेदवारी अर्जावरील फोटो आणि प्रत्यक्षात लेखी आणि शारिरीक परिक्षेला आलेले उमेदवार यांच्यात तफावत आढळून आली. आरोपीने एसआरपीएफ कडून देण्यात आलेल्या ओळख पत्रावरील फोटोमध्ये छेडछाड करुन डमी उमेदवाराचे फोटो लावल्याचे आढळून आले.

फिर्यादी वैजनाथ चव्हाण यांनी याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्य़ाद दिल्यानंतर आरोपी दीड वर्षे फरार होता. त्याला काल अटक करुन आज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला ३१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. न्यायालयात सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकिल किरण बेंडभर यांनी कामकाज पाहिले. पुढील तपास वानवडी पोलीस करीत आहेत.