पुण्यात सख्ख्या भावाच्या घरात चोरी करणाऱा गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – सख्ख्या भावाच्या घराचे कुलुप बनावट चावीच्या साह्याने उघडून घरातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा २ लाख ११ हजारांचा ऐवज लंपास करणाऱ्याला गुन्हे शाखेच्या युनीट ३ च्या पथकाने चोवीस तासाच्या आत अटक केली आहे.

अरिफ शफी शेख (वय ३६, रा. कोंढवा बु.) असे अटक कऱण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकऱणी त्याचा भाऊ मोसीन शफी शेख याने फिर्याद दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा येथील मोसीन शफी शेख यांच्या घरचे कुलुप अज्ञाताने बनावट चावीच्या साह्याने उघडून घरातील कपाटातील लॉकरदेखील बनावट चावीच्या साह्याने उघडले. त्यानंतर त्यातील २ लाख ११ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा मुद्देमाल लंपास केला. यानंतर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेच्या युनीट ३ चे पथक करत होते. त्यावेळी मोसीन याचा सख्खा भाऊ अरिफ यानेच त्याच्या घरात चोरी केली असून कोळसे गल्ली कॅम्प येथे येणार असल्याची माहिती युनीट तीनचे कर्मचारी विल्सन डिसुजा यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तेथे जाऊन सापळा रचत त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने चोरी केल्याचे कबूल केले.

कर्ज झाल्याने भावाच्याच घरात चोरी
अरिफ याच्यावर मोठ्या प्रमाणात कर्ज झाल्याने त्याने भावाच्या घरात चोरी केल्याचे कबूल केले. त्याच्याकडून पोलिसांनी मुद्देमाल जप्त केलाआहे.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, किरण अडागळे, कर्मचारी विल्सन डिसोजा, सचिन गायकवाड, मच्छिंद्र वाळके, गजानन गनबोटे, दत्तात्रय गरुड, दिपक मते, सुजीत पवार, संदिप राठोड यांच्या पथकाने केली.