रेल्वेत चोऱ्या करणारा सराईत अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – रेल्वेमध्ये प्रवाशांची नजर चुकवून त्यांच्या बॅगची चेन उघडत चोरी करणाऱ्या एका सराईताला लोहमार्ग पोलीस व आरपीएफच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून १ लाख ३५ हजार रुपये किंमतीचे दागिने जप्त केले आहेत.

मनोज शरदराव मोहिते (३१, गोरेगाव इस्ट, मुंबई) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छाया नंदकुमार भोईटे (५६, बदलापूर) या कर्जत ते पुणे दरम्यान कोयना एक्सप्रेसने २२ फेब्रुवारी रोजी प्रवास करत होत्या. त्यावेळी जनरल बोगीमध्ये असताना त्यांच्या बॅगची चेन उघडून त्यातील सोन्याचे दागिने चोरी कऱण्यात आले होते. त्यांनी यासंदर्भात लोहमार्ग पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानतंर या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांच्या पथकाकडून तपास सरु करण्यात आला. त्यावेळी गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार सर्वेलन्स स्टाफ आणि आरपीएफ यांच्या मदतीने मनोज मोहिते याला चिंचवड रेल्वे स्टेशनवर ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यावर  त्याने कोयना एक्सप्रेसमध्ये चोरी केली असल्याचे कबूल केले. त्याच्याकडून या गुन्ह्यातील १ लाख ३५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.  त्याच्यावर दादर, कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल पासगे करत आहेत.

ही कारवाई पोलीस अधिक्षक दिपक साकोरे, अप्पर पोलीस अधिक्षक तुषार पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी नंदकुमार घोरपडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज खंडाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल पासगे, कर्मचारी संजीव हासे, श्रीराम लाटे, शिवराज गिरी, वाळेकर, महिला पोलीस शिपाई बेबी थोरात व आरपीएफचे जवान रसाळ, जाधव यांच्या पथकाने केली.