पुत्रप्राप्तीसाठी उकळले ६ लाख; भोंदूबाबा गजाआड

बुलडाणा : पोलीसनामा ऑनलाइन – पुत्रप्राप्तीच्या नावे आयुर्वेदिक औषधी देण्याच्या बहाण्याने तब्बल ६ लाख रुपये उकळणारा फरार भोंदूबाबा अखेर शहर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. या आरोपीविरुद्ध दोन महिन्यांपूर्वी जादूटोणाविरोधी कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते.

शहरातील उच्चभ्रू वस्ती असलेल्या विष्णूवाडीमधील एका सधन कुटुंबातील व्यक्तीच्या विवाहित मुलीस मूल होत नव्हते. वैद्यकीय उपचार व्यर्थ ठरले. खामगाव तालुक्यातील भंडारी येथील मनोज धर्मगीर मच्छेरे हा भोंदूबाबा अपत्यप्राप्तीसाठी आयुर्वेदिक औषध देत असल्याची माहिती या कुटुंबाला समजली. मच्छेरे संपर्कात आल्यानंतर त्याने मलकापूर येथील कुसूम आयुर्वेदिक औषधालयाचा संचालक मनोज जटाळेसोबत संगनमत करून ६ लाख रुपये पीडित कुटुंबाकडून घेतले. आयुर्वेदिक औषधी दिली. मात्र मुलीला पुत्रप्राप्ती झाली नाही. अखेर भोंदूबाबा मनोज मच्छेरे व आयुर्वेदिक दुकानमालक मनोज जटाळे यांच्याविरोधात तक्रार पोलिसात तक्रार करण्यात आली.

ठाणेदार यू.के.जाधव यांनी आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले. यातील दुकानदाराला अटक करण्यात आली. मात्र मच्छेरे फरार झाला होता. तो जामिनाकरिता न्यायालय परिसरात आल्याची माहिती समजताच ठाणेदारजाधव यांनी सापळा रचून त्याला अटक केली. मच्छेरे याला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

विष प्राशन करून कर्जबाजारी शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या

अकोला : दहिहांडा पोलीस स्टेशनअंतर्गत असलेल्या गांधीग्राम येथील कर्जबाजारी शेतकरी दाम्पत्याने शेतात विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना १ डिसेंबर रोजी उघडकीस आली.

गांधीग्राम येथील रहिवासी शेख उमर शेख मन्नान यांच्याकडे अडीच एकर शेती होती. त्यांच्याकडे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ६० हजार रुपये कर्ज होते. यावर्षी दुष्काळामुळे खरीप पीक हातचे गेले होते. यामुळे शे.उमर व त्यांची पत्नी नाजेमा बी विवंचनेत होते. श्निवारी सकाळी शेख उमर (४७), नाजेमा बी शेख उमर (४३) यांनी सर्वांची भेट घेऊन घरातून शेतात कामासाठी बाहेर पडले. त्यानंतर शेतात जाऊन त्यांनी विष प्राशन करून जीवनयात्रा संपविली. दरम्यान, त्यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठीही लिहून ठेवली होती. या प्रकरणी दहीहंडा पोलीस स्टेशनमध्ये मर्ग दाखल करण्यात आला आहे.