१० लाखांच्या खंडणीसाठी २ वर्षाच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या टोळीचा मुख्य सुत्रधार जेरबंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – वडाची वाडी येथील बंगल्याच्या आवारात दोन वर्षाच्या मुलाचे अपहरण करुन १० लाखांची खंडणी मागणाऱ्या अपहरणकर्त्यांच्या मुख्य सुत्रधाराला पकडण्यात पुणे पोलीस यशस्वी झाले आहेत.

पुष्कराज सोमनाथ धनवडे याचे २३ मार्च रोजी सायंकाळी सात वाजता अपहरण झाले होते. त्यानंतर ११ तासात त्याची सुटका करण्यात पोलिसांना यश आले होते. त्यावेळी पोलिसांना पाहून अपहरणकर्ते मुलाला टाकून पळून गेले होते. तेव्हापासून पोलीस या अपहरणकर्त्यांच्या मागावर होते. गुन्हे शाखेच्या पथकाला अपहरणकर्ता मांजरी येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या परिसरात गुरुवारी सकाळी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडे पोलीस चौकशी करीत असून त्याचे साथीदार कोण होते, त्याला अपहरण करण्यासाठी कोणी कोणी मदत केली. याची चौकशी करण्यात येत आहे. या चौकशीत अधिक माहिती पुढे येऊ शकणार आहे.

kidnapping

सोमनाथ धनवडे यांच्या वडाची वाडी येथील बंगल्यातून शनिवारी सायंकाळी सात वाजता पुष्कराज याचे अपहरण करण्यात आले. अपहरणकर्त्यांनी सोमनाथ धनवडे यांना फोन करुन अपहरणकर्त्यांनी मुलाला सोडायचे असेल तर १० लाख रुपयांची खंडणी मागितली.

२ वर्षाच्या मुलाचे खंडणीसाठी अपहरण झाल्याचे समजताच कोंढवा पोलीस आणि गुन्हे शाखेची विविध पथके कामाला लागली. एक टीम नाशिकच्या दिशेने रवाना झाली. तांत्रिक विश्लेषणातून अपहरणकर्ते हे उंड्री परिसरात असल्याची माहिती मिळाली. गुन्हे शाखेचे सर्व अधिकारी, कर्मचारी असा ७० ते ८० जणांचा फौजफाटा रात्री उंड्रीमध्ये दाखल झाला. त्यांनी या परिसरातील एक एक जागा पिंजून काढण्यास सुरुवात केली.

पोलिसांच्या मदतीला काही ग्रामस्थही होते. हंडेवाडी परिसरात एका बाजूला पहाटेच्या सुमारास ग्रामस्थांना मुलाच्या रडण्याचा आवाज आला. त्यांनी ही बाब पोलिसांना कळविली. त्याबरोबर पोलिसांनी त्या भागात शोध घेण्यास सुरुवात केली. तेव्हा एका बाजूला गोडावून आढळून आली. त्या ठिकाणी शोध घेण्याचा प्रयत्न करीत असताना ग्रामस्थांना एक जण मुलाला घेऊन पळून जात असल्याचे दिसले. तेव्हा त्यांनी त्याचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. तेव्हा त्याने घाबरुन शेतात मुलाला सोडून तो पळून गेला.
पोलिसांनी मुलाला ताब्यात घेऊन रविवारी सकाळी त्याच्या पालकांच्या स्वाधीन केले होते. गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त समीर शेख व त्यांच्या पथकाने रात्रभर शोध घेऊन ही कामगिरी केली होती. मुलाची सुखरुप सुटका केल्याने धनवडे यांनी पोलिसांचे आभार मानले होते.

Loading...
You might also like