कौठा ‘ऑनर किलिंग’ प्रकरण : मयत विवाहितेच्या बहिणीला अटक

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – नेवासा तालुक्यातील कौठा येथील ‘ऑनर किलिंग’च्या गुन्ह्यात पहिला आरोपी अटक करण्यात सोनई पोलिसांना यश आले आहे. मयत विवाहितेच्या बहिणीचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे आढळून आल्याने तिला अटक करण्यात आली आहे.

दिपाली ब्रह्मदेव मरकड (वय 20, रा. कौठा, ता. नेवासा) हे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. मयत मुलीचे वडील ब्रह्मदेव मरकड व तिची आई हे दोन मुख्य आरोपी फरार आहेत. कौठा येथील ‘ऑनर किलिंग’चा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींना तात्काळ अटक न केल्याने आरोपींना पळून जाण्यात यश मिळाले. या गुन्ह्यात मयत मुलीची लहान बहीण दिपाली हिचा सहभाग असल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात निष्पन्न झाले होते. त्यामुळे पोलिसांनी मयत प्रतिभा देवेंद्र कोठावले (रा. संगमनेर) हिची लहान बहीण दिपाली मरकड हिला अटक केली आहे.

आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून प्रतिभा कोठावले हिला माहेरी बोलावून घेत तिचा खून करून पहाटेच्या सुमारास जाळून टाकण्यात आले होते. आजारपणात तिचा मृत्यू झाला, असे मयत मुलीच्या नातेवाईकांनी ग्रामस्थांना सांगितले होते. परंतु तिच्या पतीने दिलेल्या फिर्यादीनंतर ही घटना ‘ऑनर किलिंग’ असल्याचे निदर्शनास आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी असलेले मयत मुलीच्या आई-वडिलांना पोलिसांनी अटक करावी, अशी मागणी केली जाऊ लागली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास देशमाने हे करीत आहेत.