Pune News : शिक्षकेस जेजूरीला नेऊन फसवणूक करणारा भामटा अटकेत

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन – तोंडओळख असलेल्या सोलापूरच्या शिक्षिकेला जेजुरी येथे फिरायला घेऊन जाण्याच्या बहाण्याने दागिने आणि रोख रक्कम घेऊन पसार झालेल्या भामट्याला पोलिसांनी अटक केली आहे. योगेश पाटील उर्फ गणेश शिवाजी कारंडे (वय-36 रा. जगदीश नगर, श्रीपुर, ता. माळशिरस, जि. सोलापूर) असे अटक केलेल्या भामट्याचे नाव आहे. लोणी काळभोर पोलिसांनी ही कारवाई करमाळा तालुक्यातील श्रीपुर येथे करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश कारंडे हा आर्थिक दृष्ट्या सधन असलेल्या महिलांसोबत फेसबूक, व्हॉट्सॲपवर ओळख वाढवून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करत होता. तसेच संबंधित महिलांचे दागिने, मोबाइल, रोख रक्कम घेऊन पसार होत होता. या गुन्ह्यातील फिर्यादी महिलेची ओळख एक वर्षापूर्वी शैक्षणिक कामानिमित्त करमाळा येथे गेले असताना आरोपीसोबत झाली. त्यावेळी त्याने महिलेचा नंबर घेऊन एक वर्ष त्यांच्यासोबत चाटिंग केले.

दरम्यान, 26 जानेवारी रोजी फिर्यादी महिला या पुण्यात येणार असल्याची माहिती आरोपीला मिळाली होती. त्याने महिलेकडे जेजुरी परिसरात फिरायला येणार का अशी विचारणा केली. त्यावर महिलेने होकार दिल्यानंतर आरोपीने महिलेला जेजुरी परिसरात चारचाकी गाडीतून तीन ते चार तास फिरवले. जेजुरी येथून परत येत असताना आरोपी गणेश कारंडे याने सासवड-हडपसर रस्त्यावर वडकी ग्रामपंचायतच्या हद्दीत महिला शिक्षिकेला रस्त्यात उतरवून तिच्या कडील मोबाइल, सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा एकूण 75 हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन पसार झाला.

महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी या महिलेला ज्या नंबर वरुन आरोपी संपर्क साधत होता त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो क्रमांक फक्त महिलेशी संपर्क साधण्यासाठी वापरला होता. त्यामुळे आरोपीचा ठावठिकाणा लागत नव्हता. पोलिसांनी 26 जानेवारीला महिलेला आलेल्या सर्व फोनची पडताळणी केली असता एक क्रमांक संशयास्पद आढळून आला. या क्रमांकावरुन पोलीस करमाळा तालुक्यातील श्रीपूर येथे पोहचले. या ठिकाणी चौकशी केली असता गावातील नागरिकांनी गणेश कारंडे याच्या हालचाली बाबत शंका व्यक्त केली.

पोलिसांनी गणेश कारंडे याला अटक करुन त्याच्या घराची झडती घेतली. त्याच्या घरात विविध कंपन्यांचे पंधरापेक्षा अधिक सीमकार्ड व मोबाइल पोलिसांना आढळून आले. तसेच महिलेसोबत संपर्क साधण्यासाठी वापरलेला क्रमांक आढळून आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली राजु महानवर करत आहेत.