भिषण दुष्काळामुळे शैक्षणिक प्रवेश घेण्यास असमर्थ झाल्यामुळे शेतकऱ्याच्या मुलाची आत्महत्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम : केज तालुक्यातील माळेगांव येथील रोहन भगवान गव्हाने या होतकरू विद्यार्थ्यांने दुष्काळामुळे शाळा-काॅलेज सुरू होऊन दोन महिने उलटले तरीही बारावीला प्रवेश घेणे पैशा अभावी शक्य होत नसल्याने काल दिनांक २३ रोजी रात्री १० ते ११ दरम्यान विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची माहिती कुटुंबियांच्या वतीने देण्यात आली.

घरच्या एकरभर शेतात भयानक दुष्काळाने पिकसुद्धा करपले. तर आई-वडील मोलमजुरी करतात‌. त्यातच लहान भाऊ लातुरला शिक्षणाकरीता ठेवलेला. त्याचा शिक्षणाचा खर्च जाऊन रोजंदारीवर घर कसंबसं चालते, मग अशा बिकट परिस्थितीत घरी शैक्षणिक शुल्क भरण्याकरीता पैसे कसे मागायचे ? या विचाराने शेवटी आत्महत्येसारख टोकाचं पाऊल उचलणाऱ्या रोहनच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळलाय. भयाण दुष्काळाने कोवळ्या जीवाचा घेतलेला हा बळी आहे. प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून रोहनच्या कुटुंबीयांना या अचानक बसलेल्या धक्क्यातुन सावरण्यासाठी आर्थिक व मानसिक आधार देऊन त्याच्या कुटुंबातील एक व्यक्ती नौकरीवर घेण्याची मागणी होत आहे.

दुष्काळाच्या पसरलेल्या भयानक दाहकतेने केज तालुक्यातील शेतकऱ्याच्या मुलाचा पहिला शैक्षणिक बळी झालेल्या रोहनच्या प्रतिमेस छत्रपती शिवाजी महाराज चौकात पुष्पहार घालुन श्रद्धांजली वाहिली.
यावेळी मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. ‌