कोल्हापूर अर्बन बँकेची 1.5 कोटीची फसवणूक, तिघांविरूध्द FIR

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – कोल्हापूर येथील अर्बन बॅंक शाखा गांधीनगर याची दीड कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. उद्योग उभारणे व मशिनरी खरेदीची बोगस कोटेशन सादर करून. दीड कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळासो चंद्राप्पा पाटील, आनंदा बाळासो पाटील ( गोकुळ शिरगाव ता. करवीर ) व भरत कुमार जैन प्रोप्रा. मे. भाग्यलक्ष्मी इंडस्ट्रिज (रा.पेंनाई इंडस्ट्रियल इस्टेट, बेंगलोर कर्नाटक ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, संशयित बाळासो पाटील व आनंदा पाटील यांचा गोकुळ शिरगाव एमआयडीसीमध्ये कारखाना आहे. या कारखान्याच्या विस्तारीकरणासाठी त्यांनी कोल्हापूर अर्बन बॅंकेच्या गांधीनगर शाखेकडे कर्जाचा प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावामध्ये उद्योगाचे विस्तारीकरण करण्यासाठी नवीन सीएनसी व व्हीसीएमसी मशिनची आवश्‍यकता असून, सदर मशिनचे कोटेशन भरत कुमार जैन यांचेकडून घेऊन ते एप्रिल २०१९ मध्ये बॅंकेला सादर केले होते. त्यावर बॅंकेने मशिनरी खरेदी करण्यासाठी संशयितांना दीड कोटी रुपयांचे कर्ज दिले होते, परंतु सदर कर्जाच्या रकमेचा विनियोग मशिनरी खरेदी करण्यासाठी न करता वैयक्तिक कारणासाठी करीत पैशाचा गैरवापर केल्याचे त्या बॅंकेच्या एका अधिकाऱ्याच्या लक्षात आले.

तसेच बॅंकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व शाखाधिकारी गौरव पाटील यांनी चौकशी केली असता कोटेशनप्रमाणे कोणतीही नवी मशिनरी त्यांच्या उद्योगाच्या ठिकाणी आढळून आली नाही. यावरून जमा केलेली कोटेशन्स खोटी व बनावट असल्याचे पुढे आले. यामध्ये भरतकुमार जैन यांचाही सहभाग असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणावरून शाखाधिकारी गौरव विजय पाटील यांनी बाळासो पाटील, आनंदा पाटील व भरतकुमार जैन या तिघांविरोधात गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यांमध्ये यांनी तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण करत आहेत.