जेजुरी गडकोटाच्या खिडकीतून पडून चिमुकली गंभीर जखमी, २४ तासांनी आली शुद्धीवर

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाईन – सुप्रसिद्ध जेजुरीगड येथील मंदिराच्या गडकोटावरून पाच वर्षांची चुमुरडी खेळता खेळता ३० फूट खोल कोसळली असल्याची घटना घडली आहे. संस्कृती सतीश केदार असे या चिमुकलीचे नाव आहे. ती आपल्या परिवारासह देवदर्शनाकरिता जेजुरीच्या मंदिरात आली होती तेव्हा ही घटना घडली. या घटनेत संस्कृती गंभीर जखमी झाली आहे.

तब्बल २४ तासानंतर संस्कृती शुद्धीवर

याबाबत मिळलेली अधिक माहिती अशी की, संस्कृती आपल्या परिवारासह जेजुरीत आली होती. मंदिरातही गडकोट आवारात खेळता खेळता ती गडाच्या दर्शनीय भागातील खिडकीतून सुमारे ३० फूट खालील कोसळली. या घटनेनंतर मात्र ताबड्तोब तिला जेजुरी येथील खासगी रुग्नालयात दाखल करण्यात आले. तब्बल २४ तासानंतर संस्कृती शुद्धीवर आली. या दुर्घटनेत तिचा डावा हात मोडला आहे तर तिच्या डोक्याला देखील गंभीर इजा झाली आहे. ही घटना बुधावारी घडली असून येत्या दोन दिवसात तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे तिच्यावर होणाऱ्या उपचाराचा खर्च देवस्थानाच्या वतीने करण्यात येणार आहे.

संस्कृतीचे वडील सतीश केदार हे बीड येथून मेहुण्याच्या लग्नानंतर नववधू आणि नवरदेवासह परिवारासह जेजुरीत खंडोबा दर्शनासाठी आले होते. दर्शन झाल्यानंतर गडकोट आवारातील बालद्वारीत लहान मुले खेळत होती. खेळता-खेळता घरातील व्यक्तींचे लक्ष चुकवून अचानक संस्कृती बालद्वारीनजीकच्या खिडकीतून गडाबाहेर तीस फूट खोल कोसळली.

भाविकांच्या सुरक्षेसाठी रेलिंग करणार

या घटनेनंतर मात्र मंदिरप्रशासनाने गडकोट आवार, बालद्वारी परिसरातील दगडी खिडक्यांना रेलिंग करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. या कामाची सुरुवात पुढील आठवड्यापासून करण्यात येणार आहे.