जम्मू-काश्मीर : हंदवाडामध्ये चकमक ! लष्कराच्या ‘कर्नल’ आणि ‘मेजर’सह 5 जवान शहीद, 2 आतंकवाद्यांचा ‘खात्मा’

श्रीनगर : पोलीसनामा ऑनलाइन – जम्मू काश्मीरमधील हंदवाडा येथे अतिरेक्यांबरोबर झालेल्या चकमकीत एक कर्नल, एक मेजर, दोन जवान आणि एक पोलीस अधिकारी शहीद झाले. जम्मू काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडा येथे ही चकमक झाली असून त्यात दोन अतिरेकी ठार झाले आहेत. जैशचे आणखी ५ ते ६ अतिरेकी येथे लपले असल्याचा संशय आहे. त्यांची शोध मोहिम सुरु आहे. त्यामुळे या संपूर्ण परिसरातील मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. अजूनही हंदवाडा येथे अतिरेकी आणि लष्करी जवान यांच्या चकमक सुरु आहे.

हंदवाडा येथे सुरु असलेल्या चकमकीत कर्नल अशितोष शर्मा हे २१ राष्ट्रीय रायफलचे कमांडिंग ऑफिसर शहीद झाले आहेत. त्यांच्यासह एक मेजर, एक पोलीस अधिकारी आणि २ जवान यांचा चकमकीत मृत्यु झाला आहे.

अतिरेकी एका घरात लपून बसले असल्याची व त्या घरातील लोकांना त्यांनी ओलीस ठेवल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली. त्यानंतर २१ राष्ट्रीय रायफलच्या पथकाने या घरात प्रवेश केला. तेव्हा अतिरेक्यांनी घरातील लोकांचा पेहराव केला होता. त्यांनी अचानक गोळीबार सुरु केला. त्यात कर्नल अशितोष शर्मा यांच्यासह ५ जण जखमी झाले. सुरक्षा दलाने घरातील ओलिसांची सुटका केली आहे.

पाकव्याप्त काश्मीरमधून २४ एप्रिलला अतिरेक्यांनी घुसखोरी केली असून ते छंगमुल्ला परिसरात लपून बसले असल्याची माहिती सुरक्षा एजन्सींना मिळाली होती. त्यानुसार या अतिरेक्यांचा शोध सुरु होता. शनिवारी झालेल्या चकमकीत २ अतिरेकी ठार झाले होते. या दोघांची ओळख अद्याप पटलेली नाही. दक्षिण काश्मीरातील दंगेरपुरा परिसरात्त अतिरेकी असल्याचा संशय असून तेथेही रविवारी पहाटेपासून सुरक्षा दलाने घेराव घातला असून तपासणी सुरु केली आहे.