‘या’ दहा देशांत होतात ‘एक देश, एक निवडणूक’ या धर्तीवर निवडणुका : भारतात शक्य आहे का ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात अनेक दिवसांपासून ‘एक देश, एक निवडणूक’ हा मुद्दा चर्चेत आहे. यावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली आहे. संसद भवनाच्या लायब्ररीमध्ये आज दुपारी ३ वाजता होणाऱ्या या बैठकीला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बसपा प्रमुख मायावती, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उपस्थित राहण्यास नकार दिला आहे. भारतात लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र घेण्यासाठी भाजप सरकारने कंबर कसल्याचे आपल्याला दिसून येत आहे.

भारत हा जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे. भारतात प्रत्येक वर्षी विविध राज्यच्या तसेच महापालिका, पंचायत समित्यांच्या निवडणुका पार पडत असतात. त्यामुळे भारत सतत इलेक्शन मोडमध्येच असतो. म्हणून भारतात एक देश, एक निवडणूक या विषयावर गांभीर्याने विचार करत असल्याचे दिसत आहे.

यापूर्वी झाल्या होत्या देशात एकदाच निवडणुका
पूर्वी देखील भारतात विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणूका एकत्रित पार पडल्या होत्या. १९५२, १९५७, १९६२, १९६७ या वर्षी भारतात एक देश एक निवडणूक पार पडली होती. त्यानंतर मात्र या पद्धतीत खंड पडला आणि हि पद्धत बारगळली.

काही राज्यांच्या विधानसभा यामुळे मुदतीआधी बरखास्त कराव्या लागल्याने या पद्धतीत खंड पडला आणि त्यानंतर भारतात पुन्हा कधीच हि पद्धत अवलंबली गेली नाही. त्याचबरोबर आता जर देशात या पद्धतीने निवडणुका घ्यायचे झाल्यास निवडणूक आयोगाला नवीन ईव्हीएम मशीन खरेदी करण्यासाठी १७५१ कोटी रुपये लागतील. त्याचबरोबर वाढत्या लोकसंख्येमुळे देखील यामध्ये अडथळा येण्याची शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत.

या देशात होत आहेत एक देश, एक निवडणूक
जगातील एकूण १० देशांत सध्या एक देश एक निवडणूक हि पद्धत अस्तित्वात आहे. इंडोनेशिया, दक्षिण अफ्रीका, जर्मनी, स्पेन, हंगरी, स्लोवेनिया, अल्बानिया, पोलैंड, बेल्जियम आणि स्वीडन या देशांमध्ये हि पद्धत आजही वापरली जाते. त्यामुळे भारतात या बाबतीत काय निर्णय होतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

You might also like