एक देश, एक निवडणूक! पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी केला पुनरूच्चार

केवडिया : ‘एक देश, एक निवडणूक’, ही काळाची गरज असल्याचा पुनरूच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. सर्व निवडणुकांसाठी एकच मतदार यादी असावी. देशात सर्व राज्यांच्या विधानसभा निवडणुका लोकसभा निवडणुकीबरोबरच घेतल्या जाव्यात, असे आग्रही मत मोदी यांनी मांडले आहे. पीठासीन अधिकार्‍यांच्या 88व्या अखिल भारतीय परिषदेच्या समारोप कार्यक्रमात पंतप्रधान व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान बोलत होते.

या कार्यक्रमात पीएम मोदी पुढे म्हणाले, निवडणुका ही खर्चीक बाब आहे. तसेच सतत निवडणुका होत राहिल्यास विकासकामेही रखडतात. आपल्या देशात अनेक ठिकाणी कोणत्या ना कोणत्या निवडणुका सुरूच असतात. लोकसभा निवडणुकीबरोबरच सर्व राज्यांच्या विधानसभा निवडणुका झाल्या तर या खर्चात बचत होऊन विकासकामांना गती देता येईल. तसेच सर्व निवडणुकांसाठी एकच मतदारयादी असावी. सर्व प्रकारच्या निवडणुकांसाठी सातत्याने मतदारयाद्या अद्ययावत कराव्या लागतात. त्यामुळे पैशांचाही अपव्यय होतो. ते टाळण्यासाठी एकच मतदारयादी असायला हवी, असे मोदी म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले की, विधिमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायपालिका या तीन संस्थांमध्ये उत्तम समन्वयाची गरज आहे. राज्यघटनेत या तीनही यंत्रणांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. दरम्यान, या कार्यक्रमात 26/11च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली.