मुंबई : साकीनाका येथे आफ्रिकन नागरिकाकडून एक कोटीचे कोकेन जप्त

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पब आणि घरगुती पार्टीमध्ये मुंबईसह राज्यातील तरुणांना कोकेनचा पुरवठा करणाऱ्या आफ्रिकन नागरिकाला अंमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली आहे. अल्ला कौदिओ बोरीस (वय-42) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून 1 कोटी 32 लाखांचे 220 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले आहे.

अटक करण्यात आलेला आरोपी पश्चिम आफ्रिकेतील रहिवासी असून तो साकीनाका येथील 90 फूट रोडवर येणार असल्याची माहिती एएनसीचे पोलीस उपायुक्त शिवदीप लांडे यांनी मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे 90 फूट रोडवर सोमवारी सापळा रचला. बोरीस हा त्या ठिकाणी येताच पोलीसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली. त्यावेळी त्याच्याजवळ 220 ग्रॅम कोकेन सापडले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरीस हा कोकेन विक्रीचा मुख्य विक्रेता आहे. तो पश्चिम उपनगरातील समुद्रकिनारी आयोजित केल्या जाणाऱ्या घरगुती तसेच खासगी पार्टीत कोकेनची विक्री करीत असे. तसेच पबमध्येही तरुणांना हेरुन त्यांना कोकेन पुरवत होता. बड्या घरातील मुले, मुली यांच्या संपर्कात असल्याचीही माहिती समोर आली आहे. एएनसीने पार्टी ड्रगवर कारवाई सुरु केली असून शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना एमडीएमए या अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या उत्कर्ष पतंगे या तरुणाला रविवारी अटक केली. त्यांच्याकडून एमडीएमएच्या 97 गोळ्या हस्तगत केल्या.

Visit : Policenama.com